पुणे

Pune News : दर्शनासाठी रांगा अन् मध्यभागात वाहतूक कोंडी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी शहरातील नागरिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी केली. मध्यभागातील श्रीछत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. त्यामुळे मध्य भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. शिवाजी रस्त्यालगतच्या गल्ली-बोळात भाविकांनी बेशिस्तपणे वाहने लावल्याने कोंडीत भर पडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गर्दीत अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. देवदर्शन करून नववर्षाचे स्वागत करण्याच्या परंपरेनुसार सोमवारी पहाटेपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी आपली दुचाकी वाहने जवळपासच्या रस्त्यांवर आणि गल्ली-बोळात लावली होती.

आधीच अरुंद असलेले रस्ते वाहनांच्या गर्दीने वाहतुकीसाठी उरलेच नाहीत. परिणामी, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक आणि मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी मध्य भागातील शिवाजी रस्ता, अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा रस्ता, गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. सोमवारी सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. भाविकांनी त्यांच्या मोटारी रस्त्यावर बेशिस्तपणे लावल्या होत्या. दुचाकी गल्ली-बोळात लावल्याने वाहनांना वाट काढणे अवघड झाले होते.

वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविली

ग्रामदैवत कसबा गणपती, श्रीतांबडी जोगेश्वरी, सारसबाग श्रीसिद्धिविनायक, श्रीमहालक्ष्मी मंदिर, बुधवार पेठेतील श्रीदत्त मंदिर, श्री.अक्कलकोट स्वामी मंदिर, श्रीओंकारेश्वर, श्री.जंगली महाराज मंदिर, श्री. शंकर महाराज समाधी मंदिर येथे सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. वाहतूक नियोजनासठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सहायक पोलिस आयुक्त, 27 पोलिस निरीक्षक, 41 पोलिस उपनिरीक्षक, 950 पोलिस कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT