पुणे

Pune News : बीआरटी मार्ग नष्ट केल्याचा निषेध

Laxman Dhenge

पुणे : बीआरटीसारखी सक्षम बसवाहतूक सेवा नगर रस्त्यावरून काढून टाकण्याचा निर्णय हा पुणे महापालिकेच्या कार्यक्षमतेचा पराभव दर्शवितो, अशी टीका शाश्वत वाहतुकीचा पुरस्कार करणार्‍या संस्थांनी केली आहे. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग नष्ट केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. हर्षद अभ्यंकर (सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट), प्रांजली देशपांडे (वास्तुविशारद आणि वाहतूक नियोजक), प्रशांत इनामदार (पादचारी प्रथम), रणजित गाडगीळ (परिसर) आणि संस्कृती मेनन (पर्यावरण शिक्षण केंद्र) यांनी याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे.

त्यांनी नमूद केले आहे की, पुणे महापालिकेने जागतिक पातळीवरील शाश्वत वाहतूक पुरस्कार, अनेक परिषदांमधून पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार मिळविले. महापालिकेने ज्या बीआरटीच्या नावावर, प्रशस्त पदपथांच्या साहाय्याने पुरस्कार घेतला, केंद्र शासनाच्या निधीतून प्रकल्प राबविले तेच प्रकल्प स्वहस्ते नष्ट केले. 'जागतिक शाश्वत वाहतूक पुरस्कार', 'राहण्यायोग्य उत्तम शहर' असे अनेक पुरस्कार तुम्ही परत करावेत, अशी अपेक्षा आहे.

दुचाकी, चारचाकी वाहनांपेक्षा बसगाड्यातून अधिक प्रवासी जातात. यासाठी केंद्र शासनाचे शाश्वत वाहतूक धोरण, पुणे महानगरपालिका सर्वंकष वाहतूक आराखडा असे काही अहवाल आणि धोरणे आपण अभ्यासले असते, तर शहरासाठी श्रेयस्कर ठरले असते. बीआरटी प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन देणारा आहे, खासगी वाहनांना नाही. परंतु आमच्या पुण्यासारख्या वैचारिकदृष्ट्या प्रगत शहराचे प्रशासक खासगी वाहनचालकांच्या आवाजाला बळी पडले याचा खेद वाटतो, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

बीआरटीसंदर्भात त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात बीआरटी 'फेल' झाल्याची हाकाटी होते. सुरुवातीपासूनच बीआरटी प्रकल्पाच्या उभारणीत व संचालनात काही त्रुटी होत्या. ज्यामुळे पुणे बीआरटी कधीही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालीच नाही. त्या त्रुटी दूर करण्याचे कष्ट घेण्याऐवजी बीआरटीच संपविण्याचा सोपा पण आत्मघातकी मार्ग महापालिका प्रशासनाने निवडला, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे. बीआरटीच्या परीक्षेत इतर अनेक शहरं उत्तीर्ण होत असताना आपल्यासारख्या प्रशासकांमुळे पुणे शहर मात्र नापास झाले आहे, अशी टीका या निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT