पुणे

Pune News : पीएमपी चालकाला सिग्नल तोडणे भोवले

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिग्नलचे पालन न करताच बसगाडी पळविणे एका पीएमपीच्या बसचालकाला चांगलेच महागात पडले. एका प्रवाशाने सोशल मीडियावर तक्रार करताच पीएमपी प्रशासनाने संबंधित बसचालकाला तत्काळ 1 हजार 772 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, अशाप्रकारे सिग्नल तोडल्यास आणखी कडक कारवाई करण्याचा पवित्रादेखील पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

सिग्नलला फाटा देत पळ काढणार्‍या पीएमपी बसचा व्हिडिओ काढून त्याची तक्रार एका जागरूक प्रवाशाने पीएमपी प्रशासनाला नुकतीच केली. ही घटना गेल्या रविवारी (दि.12) दुपारी पावणेचारच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर घडली. अशा घटना शहरात दररोज सातत्याने घडत आहेत. सिग्नल तोडून पळण्याच्या नादात अनेक अपघाताच्या घटना शहरात घडल्या आहेत.

शाब्दीक चकमकींची तर गणतीच नाही. असे असतानाही पीएमपी बसचे बेशिस्त चालक वाहतुकीच्या नियमांचे अजिबात पालन करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांना पीएमपीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते शिस्त लावणार का, हे पाहावे लागणार आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावरील प्रत्येक सिग्नलचे पालन करणे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन पीएमपीच्या प्रत्येक बसचालकानेदेखील करायला हवे. तक्रार मिळताच संबंधित चालकाला दंड करण्यात आला आहे. अशाप्रकारे सिग्नलचे उल्लंघन केल्यास आणखी कडक कारवाई करण्यात येईल.

– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT