पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी लागू केली असतानाही प्रत्येक सणांमध्ये प्लास्टिकच्या फुलांचा सजावटीमध्ये वापर होऊन पर्यावरणास हानी पोहचते. त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात मी लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात प्रदर्शनद्वारे फुलांचे हब तयार होण्यासाठी गायरान जमिनी करार पध्दतीने मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र नर्सरीमेन असोस. ऑफ एन्व्हारमेंट हॉर्टिकल्चरच्या संयुक्त विद्यमाने देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय हॉर्टीप्रोइंडिया हे बागायती फुलोत्पादनाचे प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि.23) झाले. कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर येथील मैदानावर सुरू झालेले हे प्रदर्शन रविवारपर्यंत नोव्हेंबरपर्यंत (दि.26) सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहणार आहे.
या वेळी विविध देशांतील सहभागी प्रतिनिधींमध्ये मार्को कोंटी, मारियानो टार्टाग्लिया (जर्मनी), पिम वेंडर नॅप, बर्ट व्हॅन स्पिजक (नेदरलँड्), बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाल प्रतिनिधींचा समावेश आहे. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत चौधरी, सचिव आनंद कांचन, वसंत रासने, विश्वास जोगदंड, रामदास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा