पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रॉव्हिडंट फंडाच्या कर्जासाठी मुख्याध्यापिकेने केलेल्या अर्जावर गट शिक्षणाधिकार्याने अपुर्या सह्या केल्या. परिणामी, रखडलेल्या या प्रस्तावावर पुन्हा स्वाक्षर्या घेण्यासाठी मुख्याध्यापिकेला दिवसभर प्रभारी गट शिक्षणाधिकार्याच्या दारात उभे राहण्याची शिक्षा भोगावी लागली. पंचायत समिती हवेलीच्या शिक्षण विभागात गुरुवारी हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या उत्तमनगर (कोंढवे धावडे) प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता गुजर यांना गुरुवारी अशा मानहानीला सामोरे जावे लागले.
मुख्याध्यापिका गुजर यांनी नवीन फ्लॅट विकत घेण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेण्यासाठीचा अर्ज प्रस्ताव सादर केला होता. शिक्षण विभागातील कर्मचार्यांनी या प्रस्तावावर प्रभारी गट शिक्षणाधिकारी नीलिमा मेहेत्रे यांच्या स्वाक्षर्या घेऊन तो पुढे पाठविला. कर्ज प्रस्ताव दाखल करून बरेच दिवस उलटल्याने गुजर यांनी आपल्या कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा केला. तेव्हा अर्थ विभागात दाखल करण्यात आलेला अर्जच अपुरा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे काल सकाळीच तो अर्धवट अर्ज घेऊन त्या गट शिक्षणाधिकारी म्हेत्रे यांना भेटल्या. त्यावर जेथे माझ्या सह्या हव्यात त्या पेपर्सवर टॅग्ज लावा आणि पुन्हा बोलवेपर्यंत बाहेर थांबा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रस्तावावर पाच-सहा टॅग लावून गुजर मेहेत्रे यांच्या दारात बसून राहिल्या. जेवणाची सुटी संपल्यावर तरी मॅडम आपल्याला बोलावतील व राहिलेल्या सह्या करतील, असे वाटत असतानाच पावणेतीनच्या सुमारास मेहेत्रे मॅडम आपले सहकारी गट शिक्षणाधिकारी गोडसे व अन्य अधिकार्यांसोबत चहाला निघून गेल्या.
चार-साडेचारच्या सुमारास त्यांचे अन्य सहकारी आपापल्या जागी परतले. परंतु, मेहेत्रे मॅडम कोठे गेले, हे कोणालाच सांगता येईना. एका पत्रकाराने त्यांना फोन केला असता, आपण बाहेर झेरॉक्स काढत आहोत, असे उत्तर त्यांनी दिले. तर, अधीक्षक अर्चना जाधव यांनी त्यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी त्यांनाच पेपर्स घेऊन बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास त्या आपल्या केबिनमध्ये परतल्या व आपण शिक्षणाधिकार्यांकडे होतो, असे सांगू लागल्या. त्यावर शिक्षणाधिकारी रजेवर असल्याचे निदर्शनास आणून देताच आपण काळे साहेबांकडे होतो, असे सांगून त्या काळे साहेबांच्या सह्यांचे पेपर्स दाखवू लागल्या.
गुजर यांच्या कर्जरप्रस्तावावर सह्या करतानाही, ही आपली चूकच नाही, असे सांगायला त्या विसरल्या नाहीत. इतकेच नव्हे तर, जागच्या जागी निलंबित करण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत, चला येथून ताबडतोब निघा, अशी अपमानास्पद वागणूक त्यांनी गुजर यांना दिली.
हेही वाचा