पुणे : विद्यार्थ्यांना थेट नोकरी देणारा मनपसंत अभ्यासक्रम शिकण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य मंत्रीमंडळाने समूह विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांना नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, विद्यापीठांना अत्याधुनिक, कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम राबवता येणार आहेत. त्यामुळे शिक्षणातदेखील आमूलाग्र बदल होणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, समूह विद्यापीठ ही एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे.
ही संकल्पना प्रामुख्याने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर विकसित झाली. विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण उपलब्ध करणे आणि महाविद्यालयांचे रूपांतर बहुविद्याशाखीय महाविद्यालयांमध्ये करणे हा धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. समूह विद्यापीठे ही बहुविद्याशाखीय असतील. एका जिल्ह्यामध्ये एकाच महाविद्यालयाचे किंवा एकाच संस्थेचे आणि एकाच व्यवस्थापनाच्याअंतर्गत येणारी महाविद्यालये एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करू शकतात. यात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच महाविद्यालये असावीत. राज्यात अशा साधारण 20 ते 25 मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत.
समूह विद्यापीठांच्या बाबतीमध्ये अनुदानित महाविद्यालयांचे अनुदान सुरूच राहणार आहे. तसेच भविष्यामध्येसुद्धा ते चालू राहणार आहे. त्यामुळे या महाविद्यालयांना त्याबाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे, तसेच कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहनदेखील डॉ. देवळाणकर यांनी केले आहे.
नविन शैक्षणिक धोरणानुसार समूह विद्यापीठांची निर्मिती करणे आवश्यकच आहे. मोठमोठ्या विद्यापीठांना 800 ते 900 महाविद्यालये संलग्नित असतात. त्यामुळे अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करणे शक्य होत नाही. यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. समूह विद्यापीठांमुळे अभ्यासक्रमांमध्ये तातडीने बदल करणे शक्य आहे. त्यामुळे समूह विद्यापीठांची संकल्पना चांगली आहे.
– प्रा. डॉ. गजानन एकबोटे, अध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
शिक्षणाच्या संधी सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, शिक्षणामध्ये प्रयोगशीलता आणण्यासाठी आणि शैक्षणिक विस्तारासाठी समूह विद्यापीठांचा निर्णय महत्त्वाचा आहे. पुणे एज्युकेशन हब होण्यासाठी या निर्णयाचा नक्की फायदा होईल. अधिकाधिक शैक्षणिक संस्था समूह विद्यापीठाच्या योजनेत सहभागी होतील असा विश्वास वाटतो.
– राजेश पांडे, अध्यक्ष, पुणे एज्युकेशन फोरम
समूह विद्यापीठांमुळे शैक्षणिक निर्णय गतिमान होतील. परीक्षा वेळेत होऊन निकाल वेळेवर जाहीर होतील. महाविद्यालयांना हवे ते अभ्यासक्रम राबवता येतील. यातून राज्यात एक सकारात्मक स्पर्धा सुरू होईल. त्यामुळे राज्याने समुह विद्यापीठांचे स्वागत करणे गरजेचे आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
संचालक, उच्च शिक्षण संचालनालय
एकाच व्यवस्थापनाच्याअंतर्गत एखादे विधी महाविद्यालय असेल किंवा एकाच व्यवस्थापनाच्या अंतर्गत एखादे बी.एड्. महाविद्यालय असेल एकाच व्यवस्थापनाच्या अंतर्गत एखादे स्वतंत्रपणे वाणिज्य महाविद्यालय असेल किंवा विज्ञान महाविद्यालय असेल तर ते एकत्र येऊ शकतात. म्हणजेच या संस्थेमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येईल.
2016 च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या विद्यापीठांना घटनात्मक निर्माण करावी लागतील. या विद्यापीठांनादेखील कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, वित्त व लेखा अधिकारी अशी पदे असतील. पहिली पाच वर्षे महाराष्ट्र सरकारकडून या विद्यापीठांना प्रतिवर्षी एक कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. घटनात्मकपदी नियुक्त केल्या जाणार्या व्यक्तींच्या वेतनासाठी किंवा प्रशासकीय बाबींसाठी हे एक कोटीचे अनुदान ते वापरू शकतात. शासनाकडून ठोस अनुदान पाच वर्षांसाठी दिले जाईल.
हेही वाचा