कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनाबाबत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत निम्म्या जागेचा रोख मोबदला आणि निम्म्या जागेचा टीडीआर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, आयुक्तांनी आता भूसंपादनाबाबत भूमिका बदलली असून, प्रशासन धोरणात्मक निर्णय घेत नसल्याने जागा मालकांवर अन्याय होत आहे, अशी तक्रार पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
कदम म्हणाले, 'या रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी व वाढते अपघात रोखण्यासाठी आंदोलन करत रुंदीकरणासाठी मी आग्रही भूमिका घेतली. स्वतःची 40 गुंठे जागा देण्यासह इतर जागामालकांचे प्रबोधन केले. 2015 मध्ये कात्रज तलावाजवळील जागा हस्तांतरित केली असून, त्याचा अद्याप कोणत्याही प्रकारचा मोबदला आम्हाला मिळाला नाही. मात्र, टीडीआर घेऊन पुढील प्रक्रिया सुरू करा, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते.'
आयुक्तांनी पुन्हा बोलणी करण्यासाठी बोलावले असता 'जागा ताब्यात द्या; अन्यथा भूसंपादन कायद्यान्वये जबरदस्तीने जागा ताब्यात घेऊ आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी करण्यास परवानगी देण्यात येणार नाही', असे सांगितले. केवळ टीडीआरच्या मोबदल्यात जागा दिल्यास सर्व जागामालकांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच आयुक्तांनी भूसंपादनाबाबत दिलेला शब्द फिरवला असून, ते चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याचे कदम यांनी सांगितले.
रस्त्याच्या आराखड्यात काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे. भूसंपादनाबाबत जागामालकांवर आयुक्तांकडून दबाव आणण्यात येत आहे. यामुळे रुंदीकरणाच्या कामास खीळ बसू शकते. पालकमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामात लक्ष घालावे.
प्रकाश कदम, माजी नगरसेवक.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.