पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत धाराशिवच्या मनोज माने आणि नागपूरच्या शुभम मुसळे यांच्या 92 किलो वजनी गटाची अंतिम लढत होणार आहे. उपांत्य फेरीत दोघांना प्रतिस्पर्ध्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढावा लागला. आदित्य कांबळे आणि स्वप्नील काशीद यांच्यात 79 किलो वजनी गटात गादी विभागातील अंतिम लढत होणार आहे.
66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील 92 किलो वजनी गटातून माती विभागातून अंतिम फेरी गाठताना मनोज मानेने धाराशिवच्या सुनील नवलेचे आव्हान 8-4 असे परतवून लावले. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत सुरुवातीलाच सुनीलने एकत्रित 4 गुणांची कमाई करून सनसनाटी सुरुवात केली. पण, त्यानंतर मनोजने दोन दोन गुणांची दोन वेळा कमाई करून पहिल्या फेरीत 4-4 अशी बरोबरी साधली.
त्यानंतर सुनीलला बचावात्मक खेळण्याचा फटका बसला. उलट, मनोजने दोनवेळा एकेक आणि एकदा दोन गुण घेत चार गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत त्याची गाठ नागपूरच्या शुभम मुसळेशी पडणार आहे. शुभमनेही अंगद बुलबुलेचा पहिल्या फेरीतील प्रतिकार 8-5 असा परतवून लावला. अंगदने एकत्रित 4 आणि नंतर एका गुणाची कमाई करून पहिली फेरी जिंकली होती. पण, दुसर्या फेरीत शुभमने प्रतिआक्रमण करताना भारंदाज डावाचा पूर्ण वापर करत चारवेळा 2 दोन गुणांची कमाई करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
याच वजनी गटात गादी विभागात विजय शिंदेने अंतिम फेरी गाठताना सोलापूरच्या निकेतन पाटीलचा तांत्रिक वर्चस्वावर 10-0 असा पराभव केला. अन्य एका लढतीत पुण्याच्या अभिजित भोईने अनिकल जाधवचे आव्हान 7-1 असे मोडून काढले. स्पर्धेतील 86 किलो वजनी गटातून विश्वचरण सोलकरने सांगलीच्या शुभम पवारचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
गादी विभागात 79 किलो वजनी गटातन धाराशिवच्या आदित्य कांबळे याने नगरच्या धुळाजी ईटकरला तांत्रिक वर्चस्वावर 11-0 असे हरवून अंतिम फेरी गाठली. पाच मिनिटे 22 सेकंद चाललेल्या या लढतीत आदित्यने सुरुवातीला 1 नंतर एकत्रित 4 आणि पाठोपाठ तीनवेळा दोन दोन गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाच्या लढतीत आदित्यची गाठ सोलापूरच्या स्वप्नील काशीदशी पडेल. स्वप्नील काशीदने वाशीमच्या स्वप्नील शिंदेचा गुणांवर 5-0 असा पराभव केला.
हेही वाचा