पुणे

Pune News : खेड तहसील कार्यालयाबाहेरच मरण पत्करू

Laxman Dhenge

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : 'आमच्या पुनर्वसनाच्या घोषणा देत तुम्ही प्रसिद्धी मिळवली… भूसख्खलन होण्याची भीती उरात बाळगून आम्ही मुलांबाळांसोबत चार वर्षे घालवली… आता आम्ही ठरवलंय तिथे मरण्यापेक्षा इथे खेड तहसीलदारांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून प्राणत्याग करू,' असा निर्धार करत पदरवाडी (ता. खेड) येथील आदिवासी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.
भीमाशंकरवाडीच्या मागे पदरवाडी ही जेमतेम 16 ते 20 घरांची आदिवासी वस्ती आहे.

या वाडीचा मागील भाग सपाट असून, त्याखाली मोठा कडा आहे. वाडीच्या मागे असलेला भाग गेली काही वर्षे खचत चालला आहे. भूस्खलन होण्याची भीती व्यक्त होत असताना या वर्षीच्या पावसात सुमारे सहा ते सात फूट खोल आणि सुमारे 500 मीटर लांबीच्या भेगा पडून भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याची पाहणी करून येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येईल, असे शासनाकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र, चार वर्षे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. भूस्खलन होण्याची भीती वाढली असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून, ठोस भूमिका घेतली जात नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पदरवाडी गावातील नागरिकांनी सोमवारी (दि. 11) खेड तहसील कार्यालयापुढे प्राणांतिक उपोषण आंदोलन सुरू केले.

तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांचे म्हणणे तातडीने जिल्हाधिकारी यांना कळविण्याचे आश्वासन दिले. आम्हाला सुरक्षित जागा आणि घर मिळाले नाही तर आमचे मरण निश्चित आहे. त्यापेक्षा उपोषण करून मरण पत्करणे योग्य राहील, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांसमोर मांडली. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती व जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड बजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, भोरगिरीचे सरपंच दत्तात्रय हिले, संतोष भांगे, सोमनाथ दिवाळे, दिलिप डामसे, सामा काळे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT