पुणे

Pune News : जिल्हा बँकेसाठी जुन्नरमध्ये काळे विरुद्ध सोनवणे सामना रंगण्याची चर्चा, राजकीय समीकरणांना वेग

बाजार समितीत गळाभेट, बँकेत मात्र संघर्ष? लेंडे, बेनके आणि शेरकरांची भूमिका निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक संजय काळे यांच्या विरोधात यावेळी कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता असतानाच नारायणगाव येथील सोसायटीने आमदार शरद सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी ठराव केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काळे यांच्या विरोधात आमदार सोनवणे हेच दंड थोपटणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी, जुन्नरमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काळे विरुद्ध सोनवणे असा थेट सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी जुन्नर तालुक्यातील जिल्हा बँकेची निवडणूक तुलनेने एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सोनवणे यांच्या नावाचा ठराव झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दोन्ही गटांकडून मतदारांची जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता असून, विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची मते मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय मोर्चेबांधणी होणार असल्याची चर्चा आहे. मतांच्या बदल्यात पैशांचा वापर होण्याबाबतही चर्चा रंगत असली, तरी याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. संजय काळे आणि लेंडे यांच्यातील राजकीय संबंधांबाबत तालुक्यात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, दोघेही एकाच पक्षाशी संबंधित असल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेंडे यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातून उमेदवारी मिळाल्यास त्यांची भूमिका कोणाच्या बाजूने राहणार, याकडे विशेष लक्ष लागले आहे.

बाजार समितीच्या सभेतील जवळीक चर्चेत

मागील महिन्याच्या अखेरीस झालेल्या जुन्नर बाजार समितीच्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवरही राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. या सभेत आमदार शरद सोनवणे यांच्या गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्वतः सोनवणे सभेला उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या भाषणात सभापती संजय काळे यांचे कौतुक केले. त्यानंतर सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते काळे यांचा सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे तर सभा संपल्यानंतर सोनवणे व काळे यांनी एकत्र भोजन केल्याचेही पाहायला मिळाले.

काही महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या कारभाराविरोधात मोर्चा काढणारे सोनवणे अचानक काळे यांच्या जवळ आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या जवळिकीमागील नेमके राजकीय गणित काय, याबाबत अद्याप दोन्ही गटांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

मतांच्या जुळवाजुळवीकडे लक्ष

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांतील मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः दिवंगत आशाताई बुचके यांना मानणाऱ्या मतदारांची भूमिका या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे या मतदारांवर दोन्ही गटांचे बारीक लक्ष असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

संजय काळे हे माजी आमदार व सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव काळे यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले नेते असल्याने सहकार क्षेत्रातील त्यांचे नेटवर्क आणि मतदारांशी असलेला दांडगा संपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. दुसरीकडे आमदार शरद सोनवणे यांच्याकडेही स्वतःचा राजकीय प्रभाव व समर्थकांचा मोठा जनाधार आहे.

बेनके-शेरकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

माजी आमदार अतुल बेनके आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. हे दोन्ही नेते संजय काळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात की निवडणुकीच्या पुढील टप्प्यात काही वेगळे राजकीय समीकरण आकाराला येते, यावर संपूर्ण निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.

एकंदर, नारायणगाव सोसायटीच्या ठरावामुळे जुन्नर तालुक्यातील जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. काळे विरुद्ध सोनवणे असा सामना प्रत्यक्षात उभा राहिल्यास सहकार क्षेत्रातील या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागेल. कोणत्या गटाची मोर्चेबांधणी प्रभावी ठरते आणि कोण बाजी मारणार, हे निवडणुकीतील पुढील घडामोडींनंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT