पुणे

Pune News : नांदेड सिटीत मिळकत कर आकारणी सुरू

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नांदेड सिटी प्रकल्पातील सदनिकांना महापालिकेने कर आकारणी करण्यास सुरुवात केली असून, राज्याच्या टाउनशिप कायद्यानुसार करामध्ये 66 टक्के सवलत देण्यात आली आहे. या सोबतच सदनिकाधारक स्वतः राहत असल्यास उर्वरित करावर पुन्हा 40 टक्के सवलत देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी 30 जानेवारीपर्यंत पीटी-3 फॅार्म भरणे बंधनकारक असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या 23 गावांमधील मिळकतींना करआकारणीची बिले पाठवण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड सिटी ही टाउनशिपदेखील यापैकी नांदेड गावाचा भाग असल्याने तेथील नागरिकांना बिले पाठविण्यात आली आहेत. या टाउनशिपमध्ये 12 हजार सदनिका आणि व्यावसायिक दुकाने, कार्यालये आहेत. टाउनशिप असल्याने येथे थेट जलसंपदा विभागाकडून पैसे आकारून पाणीपुरवठा केला जातो. तसेच स्वच्छता, पथदिवे व इतर सुविधादेखील टाउनशिपकडून पुरविण्यात येतात शिवाय रहिवाशांनी एकरकमी मेन्टेनन्स जमा केला आहे. यामुळे महापालिकेचा कर लागणार नाही, अशी धारणा येथील नागरिकांची होती. त्यामुळे महापालिकेची कराची बिले हाती पडताच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, नांदेड गाव महापालिकेत आल्याने नांदेड सिटीही महापालिकेत आली आहे. त्यामुळे नांदेड सिटीतील रहिवाशांना महापालिकेचा मिळकतकर लागू झाला आहे. ही बाब नांदेड सिटीमधील सदनिका खरेदी करारनाम्यातही (ऍग्रिमेंट) नमूद आहे, असे टाउनशिपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी स्पष्ट केले आहे. करआकारणी प्रमुख अजित देशमुख म्हणाले, ग्रामपंचायतीला नगरनियोजनाचा अधिकार नसल्याने नांदेड ग्रामपंचायतीने नांदेड सिटीला मिळकतकर आकारला नव्हता.

जून 2021 नंतर नांदेड सिटी महापालिकेत आल्याने मिळकतकर लागू झाला आहे. टाउनशिप कायद्यानुसार 66 टक्के सवलतीसह कराची बिले दिली आहेत. ही बिले 2021 पासूनची असल्याने रक्कम मोठी वाटते. निवासी मिळकतींना उर्वरित 34 टक्के करावर 40 टक्के सवलतही मिळणार आहे. परंतु, मालक स्वत: त्या मिळकतीमध्ये राहात असल्याबाबत दोन पुराव्यांसह पी टी 3 फॉर्म येत्या 30 जानेवारीपर्यंत द्यावा लागणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT