पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शासकीय शाळांमध्ये टीडी (टिटॅनस डिप्थेरिया) लसीकरणाची विशेष मोहीम सध्या राबवली जात आहे. सध्या महापालिकेला 20 हजार डोस मिळाले असून, गरज भासल्यास आणखी लसींची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे. टीडी लसीचा पहिला डोस वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच पाचवी आणि सहावीतील मुलांना दिला जात आहे. दुसरा डोस सोळाव्या वर्षी म्हणजे नववी आणि दहावीतील मुलांना दिला जात आहे. यापूर्वी बाह्यरुग्ण विभागात आलेल्या मुलांना महापालिकेतर्फे लसीकरण केले जात होते. टीडी लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश असल्याने लसीकरणावर भर देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे.
गर्भवती महिलांनाही टीडी लसीकरण केले जाते. गर्भधारण निश्चित झाल्यावर पहिला डोस आणि चार-सहा आठवड्यांदरम्यान दुसरा डोस दिला जातो. नवजात बालकांना पेंटाव्हॅलंट लसीतून टिटॅनस अर्थात धनुर्वाताची लस दिली जाते. बालकांमधील धनुर्वाताची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर दहाव्या वर्षी भारत बायोलॉजिकल कंपनीची लस दिली जाते. आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शाळांमध्ये टीडी लसीकरण मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
सध्या राज्य शासनाकडून 20 हजार डोस प्राप्त झाले असून, 13 हजार शालेय मुलांसाठी आणि 7 हजार डोस गर्भवती महिलांसाठी वापरले जात आहेत. आणखी लसींची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. टीडी लसीबद्दल पालकांमध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे.
– डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी
हेही वाचा