पुणे

Pune News : ..अखेर ‘त्या’ बिल्डरांवर गुन्हे दाखल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव येथील 11 बेकायदा इमारतींचे बांधकाम प्रकरणी तेथील दहा विकसक संस्था, मालक व संचालकांवर अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आंबेगाव येथील स. नं. 10 मधील अथर्व डेव्हलपर्स व इतर, साई गणेश डेव्हलपर्स व इतर, श्रावणी डेव्हलपर्स व इतर, आर. एल. चोरगे व इतर, श्री डेव्हलपर्स व इतर, साईनाथ डेव्हलपर्स व इतर, समर्थ डेव्हलपर्स व इतर, गवळी व इतर, मौर्य डेव्हलपर्स व इतर, गुरुदत्त डेव्हलपर्स, गुरुदत्त डेव्हलपर्स, आदींच्या 11 बेकायदा इमारतींचे बांधकाम महापालिकेने 28 डिसेंबर रोजी पाडून टाकले.

या कारवाईत सुमारे 44 हजार चौ. फूट बांधकाम पाडण्यात आले आहे. दरम्यान, या विकसक बिल्डरांना 20 डिसेंबरला चोवीस तासांत अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत तसेच स्वत:हून बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीसेस बजावण्यात आल्या होत्या. परंतू यानंतरही याठिकाणी काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने कारवाई केली. याप्रकरणी इमारतींच्या विकसक, मालक व संबधितांविरोधात एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विकास झोन क्र. 2 चे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी दहाही बिल्डरांवर गुन्हे दाखल केले आहेत.

"आंबेगाव बुद्रूक येथे अधिकृत इमारती उभ्या करणार्‍या 10 बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील अवैध बांधकामे रोखण्यासाठी आम्ही वारंवार कारवाई करत आहोत."

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

हेही वाचा

SCROLL FOR NEXT