पुणे

Pune News : धोकादायक ऊस वाहतूक वाहनांकडे दुर्लक्ष कायम !

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : एक नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला. जवळपास महिना पूर्ण होऊनही ऊस वाहतूक करणारी वाहने व रिफ्लेक्टर नसलेली वाहने रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत. आरटीओ आणि पोलिस प्रशासन याबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र बारामती तालुक्यात पाहायला मिळत आहे. धोकादायक पध्दतीने वाहनांचा प्रवास अपघातांना निमंत्रण देत असून, 'मोठ्या घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का ?' असा सवाल यानिमित्ताने तालुक्यातील जनता विचारत आहे.

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला की, रस्त्यावर सुरक्षित वाहतूक अभियान राबविण्याची गरज आहे. वाहनचालकांवर कारवाई करून फक्त प्रश्न सुटणार नसून, त्यांना याबाबत मार्गदर्शन व वाहतुकीचे नियम याबाबतही समुपदेशन करणे आवश्यक आहे. अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामीण भागात वाहनांबाबतीत व ते चालविण्याबाबतीत फारसे गांभीर्य राहिलेले नाही. यासाठी अधिकार्‍यांनी साखर कारखाने व वाहतूकदार यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्याची गरज आहे.

यासाठी सुरक्षित वाहतूक अभियान राबविण्याची गरज आहे. वारंवार अपघात होतात, याला सर्वस्वी ऊस वाहतूक करणारे वाहनचालक जबाबदार नसले, तरीही नियमांचे पालन न करता होणार्‍या अपघातांना जबाबदार कोण ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उसाची वाहने उभी करणे, मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे, एकाच ट्रॅक्टरला दोन ते तीन ट्रॉली जोडणे, अपघात होऊ नये यासाठी पुरेशी काळजी न घेणे, ट्रॅक्टरवर बसविण्यात आलेली कर्णकर्कश साउंड सिस्टिम, विनाकागदपत्रे व विनापरवाना वाहने चालविणे, अल्पवयीन वाहनचालकांची वाढलेली संख्या यामुळे तालुक्यातील राज्य मार्गावर वारंवार अपघात होत असतात. काही वाहनचालक मात्र सर्व नियम पाळून वाहतूक करीत असतात. याप्रमाणे सर्वांनी नियम पाळणे आवश्यक आहे. रात्री व पहाटेच्या वेळी सर्वाधिक अपघात होत असल्याने प्रवास टाळण्याची गरज आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT