बारामती : एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झालेल्या बारामतीच्या उद्योजक मनोज तुपे विरोधात सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा पोलिस ठाण्यात ५१ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दूध डेअरी चालकाकडून दूध घेत त्याला बिल अदा न करता ही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दूध डेअरी चालक बंडू सुखदेव लेंडवे (रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज तुपे, प्रवीण शिवाजी तावरे, बाबुराव नकाते व सुशांत ज्ञानदेव शिर्के या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दि. ११ ते २९ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लेंडवे हे दूध डेअरी चालक आहेत. बाबुराव नकाते (रा. पंढरपूर) यांच्याशी त्यांची व्यवसायातून ओळख झाली. त्याने मनोज कुंडलिक तुपे याच्याशी ओळख करून दिली. त्यानुसार तुपे यांच्या रियल डेअरी बारामती व फाॅरच्युन डेअरी, इंदापूर यांच्या मालकीच्या डेअरीत दुध घाला असे सांगण्यात आले. सन २०२० मध्ये त्यासाठी दूध संकलन अधिकारी प्रवीण तावरे, मॅनेजर सुशांत शिर्के, दूध संकलन अधिकारी विनायक जाधव हे आंधळगावला गेले. तेथे दूधाला अधिकची रक्कम देवू असे सांगितले. पुढे तुपे याच्याशी फिर्यादीने चर्चा केली. बल्क कुलरच्या मशिनरी, दूध तपासणी करण्यासाठी मशिन, जनरेटर देवू असे तुपे याने सांगितले. त्यानंतर फिर्यादीने चार हजार लिटर दूध रिअल डेअरीला दिले. त्यानंतर ते चार ते पाच हजार लिटर दूध पुरवठा करत होते. काही दिवसांनी तुपे यांनी दूध वाढवा, अधिक कमिशन देतो असे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने दूध संकलन १० ते १२ हजारावर नेले. दूधाचे बिल रिअल डेअरीकडून फिर्यादीच्या खात्यावर जमा होत होते. त्यानंतर तुपे याने फिर्यादीला तुमच्या पत्नीच्या नावे खाते उघडा, त्याला अनुदान मिळते असे सांगितले. त्यानुसार पुढील बिल त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यावर जमा होवू लागले.
११ जानेवारी ते २९ जानेवारी २०२२ या कालावधीत फिर्यादीने १९ टॅंकरद्वारे १ लाख ७९ हजार ५०८ लिटर दूध रिअल डेअरीला दिले. परंतु त्यांनी त्याची रक्कम दिली नाही. फिर्यादी बंडू लेंडवे यांनी पाठपुरावा केला असता चार दिवसात जमा होईल असे आश्वासन दिले जात होते. पुढे ३० जानेवारी २०२२ पासून दूधाचे रिकामे टॅंकर त्यांच्याकडे पाठवणे बंद केले गेले. त्यांच्याकडे संकलित दूध खराब होवू लागले. त्यामुळे त्यांनी बारामतीत डायनामिक्स डेअरीला दूध सुरु केले. पुढे रिअल डेअरीचे तावरे, नकाते, शिर्के यांनी फिर्यादीकडे येत आम्ही दिलेल्या मशिनरीचा वापर करायचा नाही, इतरांना दूध विकायचे नाही अशी धमकी दिली. फिर्यादीने त्यांना थकलेली ५१ लाख ५१ हजाराची रक्कम द्या, अशी मागणी केली, परंतु तुम्ही काटेवाल्याशी संगनमत करून दूधाचे वजन वाढवून दिले आहे, ते तपासल्यावर तुमची रक्कम दिली जाईल असे सांगण्यात आले. आम्ही अनेकांना पोलिस ठाण्यात अडकवले आहे, तुम्हालाही अडकवू अशी धमकी देण्यात आली.
फिर्यादीने पुढे अनेकदा दूध बिलाची मागणी केली. परंतु तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये टाकतो, खतम करतो अशी धमकी देण्यात आली. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर फिर्य़ादीने फिर्याद दाखल केली.
यापूर्वीदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल
उद्योजक मनोज तुपे व अन्य तिघांविरोधात यापूर्वीही दौंड पोलिस ठाण्यात दूध संकलन करून त्याचे बिल न देता ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. बारामतीतून पुण्यात जात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा नुकताच त्याच्यावर दाखल झाला आहे. त्यापाठोपाठ आता मंगळवेढ्यात तुपे विरोधात गुन्हा दाखल झाला.