पुणे : विसर्जन मिरवणुकीत कोण कधी सहभागी होणार, यावरून वाद सुरू असतानाच मध्यवर्ती भागातील तब्बल 60 गणेश मंडळांनी एकत्रित भूमिका जाहीर करीत लक्ष्मी रस्त्यावर सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बेलबाग चौकातून सकाळी 7 वाजता मिरवणुकीची सुरुवात करून 12 ते 1 पर्यंत आम्ही लक्ष्मी रस्ता मोकळा करू, अशी माहिती मंडळांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख व संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे, मुठेश्वर मित्र मंडळाचे गणेश भोकरे, सहकार तरुण मंडळाचे भाऊसाहेब करपे, दशभुजा गणपती मंडळाचे रवि किर्वे, महाराष्ट्र तरुण मंडळ हनुमंत शिंदे, राकेश डाकवे, सुरेश जैन, राहुल आलमखाने, शैलेश बडाई आदी उपस्थित होते.
यंदा मानाच्या पाच गणपती पाठोपाठ श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि अखिल मंडई मंडळाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. निर्णय जाहीर केल्यापासूनच इतर मंडळांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत मानाचे गणपती मंडळे आणि इतर मंडळांच्या प्रतिनिधीशी पोलीस आयुक्तांनी बैठक घेतली. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यातच आता शहराच्या मध्यवर्ती भागातील 60 मंडळांनी एकत्रित भूमिका जाहीर करीत सकाळी 7 वाजताच मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना गणेश भोकरे म्हणाले, लक्ष्मी रस्त्यावरून मानाचे गणपती मंडळे जातात. त्यापाठोपाठ इतर प्रमुख मंडळे गेल्याने सायंकाळपर्यंत लक्ष्मी रस्ता खाली होत नाही. त्यामुळे आम्ही यंदा सकाळी 7 वाजताच सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. संजय मोरे म्हणाले, आम्ही 60 मंडळे एकत्र आहोत आणि सकाळी 7 वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. छोटे मंडळे काय मंडळे नाहीत का? प्रशासनाने वेळीच यात लक्ष घालण्याचे आवाहन मोरे यांनी केले.
मध्यवर्ती भागातील 60 मंडळांनी सकाळी 7 वाजताच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून ही मंडळे पुढे जाणार असून मिरवणूक लवकर संपवावी यासाठी आम्ही ’एक गणपती - एक पथक’ हे तत्व अंमलात आणणार आहोत. आम्ही साधारण एक ते दीड पर्यंत लक्ष्मी रस्ता खाली करू, असेही यावेळी सांगण्यात आले.