पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या प्रदूषणात भर टाकणार्या घटकांच्या तपासणीसाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 15 पथकांची नेमणूक केली आहे. आज गुरुवारपासून बांधकामे, राडारोडा, विकासकामांचे प्रकल्प तसेच वायुप्रदूषण होणार्या ठिकाणांची या पथकांकडून पाहणी करण्यात येणार असून, त्यासंबंधीचा दैनंदिन अहवाल सादर केला जाणार आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर तब्बल दोन आठवड्यांनंतर या पथकांच्या नेमणुकीला मुहूर्त मिळाला आहे.
पुण्यासह विविध महानगरांमधील प्रदूषणाची पातळी गंभीर अवस्थेत पोहचली आहे. या प्रदूषणाला पायबंद घालण्यासाठी केंद्राने प्रत्येक शहरासाठी नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार राज्य शासनाने महापालिकांना या नियमावलीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. शहरात बांधकामे तसेच पाडकामांच्या ठिकाणी उडणारे धोकादायक धूलिकण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना त्यामध्ये देण्यात आल्या आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि शहरातील प्रदूषणात भर टाकणार्यांच्या तपासणीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर 15 पथके नेमण्याचे आदेश दि. 9 नोव्हेंबर रोजी काढले होते. त्यानुसार अखेर ही पथके आता स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात उपअभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचा एक सुरक्षा कर्मचारी असणार आहे. या पथकांकडून बांधकाम प्रकल्प, उड्डाणपूल, महापालिकेची विकासकामे तसेच राडारोडा आणि बांधकामाचे साहित्य वाहतूक करताना नियमांची अंमलबजावणी केली जाते की नाही, याची तपासणी ही पथके करणार आहेत.
प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील बांधकाम आणि विकासकामांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी पंचवीस फूट उंच पत्रे उभारणे, जूटची भिजविलेली जाळी लावणे, बांधकामाच्या परिसरात धूळ असल्यास सातत्याने पाणी मारणे, असे नियम महापालिकेकडून घालून देण्यात आले आहेत. या नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार सहा बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजाविण्यात आली आहे. नोटीसच्या अनुषंगाने पूर्तता न केल्या संबंधित बांधकाम थांबविण्याची कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विकास खेमणार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा