Drunk Driving  Pudhari
पुणे

Pune New Year Drunk Driving Action: नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात मद्यपी चालकांवर कडक कारवाई; 36 विशेष पथके तैनात

मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास थेट न्यायालयात हजेरी; 26 डिसेंबरपासून तपासणी मोहीम तीव्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नववर्षाच्या स्वागताला मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात तब्बल 36 विशेष पथके तैनात केली आहेत. यात 30 वाहतूक पोलिस आणि 6 आरटीओची पथके आहेत. विशेष म्हणजे, यंदा केवळ दंड भरून सुटका होणार नाही, तर दोषी चालकांना थेट न्यायालयात हजर राहावे लागणार असून, तिथूनच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

31 डिसेंबर आणि नूतन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्या, जल्लोषाच्या काळात रस्ते अपघात रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिस आणि आरटीओ ॲक्शन मोडवर आले आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी आणि मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ, वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जाणार आहेत.

26 पासूनच नाकाबंदी

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबरपासूनच शहराच्या विविध भागांत तपासणी मोहीम सुरू झाली आहे. 26 डिसेंबरला शहराच्या विविध भागांत रात्रभर तपासणीसाठी 20 पथके कार्यरत राहणार आहेत, तर 27 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 दरम्यान 30 पथके दररोज रात्री शहरात तैनात असणार आहेत. एका पथकात 1 वरिष्ठ अधिकारी आणि उर्वरित पोलिस अंमलदार असे एकूण 10 जण कार्यरत असतील.

कॅब, पर्यायी चालकाची व्यवस्था करावी

31 डिसेंबर, नवीन वर्षाचे सेलिबेशन करताना जबाबदारीने वागावे, मद्यप्राशन केले असल्यास वाहन चालवण्यासाठी पर्यायी चालकाची व्यवस्था करावी किंवा कॅबचा वापर करावा, जेणेकरून नवीन वर्षाची सुरुवात सुरक्षित होईल, या पर्यायाचा अवलंब नागरिकांनी करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून करण्यात आले आहे.

26 तारखेपासूनच तपासणी मोहीम तीव केली आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही कारवाई अधिक कडक होईल. जर कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळले, तर त्याला थेट न्यायालयात उभे केले जाईल. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर

आरटीओची 6 विशेष पथके मैदानात

वाहतूक पोलिसांच्या 30 पथकांव्यतिरिक्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आरटीओची) सहा भरारी पथकेही रात्रभर गस्त घालणार आहेत. ही पथके प्रामुख्याने गंभीर अपघात रोखण्यासाठी आणि मद्यपी चालकांवर जरब बसवण्यासाठी काम करणार आहेत. विशेषत: ही पथके ज्या भागात जल्लोषाचे वातावरण अधिक असते, तो भाग आणि शहराचे एन्ट्री, एक्झिट पॉइंट याव्यतिरिक्त महामार्गावरही तैनात असतील. तसेच यातीलच काही पथके फिरतीवर राहणार असल्याचे आरटीओकडून कळवण्यात आले आहे.

31 डिसेंबरच्या काळात होणारे संभाव्य अपघात रोखणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीओची 6 पथके रात्रभर तैनात राहून तपासणी करत दोषींवर कारवाई करतील. वाहनचालकांनी स्वतःचा, इतरांचा जीव धोक्यात घालू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवणे टाळावे.
स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT