पुणे: हडपसरचे शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि माजी नगरसेवक योगेश ससाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षासह पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी सायंकाळी मुंबईत हे पक्षप्रवेश होणार आहेत. शिवसेनेतील पक्षफुटीनंतर माजी आमदार बाबर हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत कायम राहिले होते. विधानसभा निवडणुकीत ते ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. (Latest Pune News)
मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली होती. त्यामुळे बाबर नाराज होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत आपली नाराजी दाखवून दिली होती. त्यानंतर मध्यंतरी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, बाबर यांनी आता उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला असून, ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि योगेश ससाणे हेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हडपसर मतदारसंघात ठाकरेंसह पवारांना मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून, महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
पुढच्या टप्प्यात आणखी प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आगामी काळात महाविकास आघाडीमधील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांचे प्रवेश होणार असल्याचे समजते. त्यामध्ये शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघातील पदाधिकार्यांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.