Pune NCP Corporators Protest Pudhari
पुणे

Pune NCP Corporators Protest: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विकासनिधी ‘शून्य’; पुणे महापालिकेत भाजपविरोधात ठिय्या आंदोलन

बालवडकर-टिंगरे यांच्या प्रभागातील निधी कपातीने महायुतीत तणाव; संविधानाची प्रत हातात घेत राष्ट्रवादीचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील विकास निधी 'शून्य' केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडला आहे. याचे पडसाद शुक्रवारी उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, आमदार यांनी महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. या वेळी हाती संविधानाची प्रत घेत भाजपच्या या घटनेचा निषेध करीत जोरदार घोषणाबजी केली. 'दादागिरी नहीं चलेगी', 'अजित पवार अमर रहे'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता.

कोथरूड येथील आमदार निधीतून झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीत प्रस्ताव दिल्याने सत्ताधारी भाजपने मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बालवडकर यांचा निधी शून्य केला. तसेच, बालवडकर यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील निधीचे वर्गीकरण करून तो दुसऱ्या प्रभागात वळवला. या घटनेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतापाचे वातावरण होते. या निर्णयाच्या निषेधार्थ महापालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. 'निधी पळवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे करायचे काय? खाली डोके, वर पाय', 'नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी', 'पाशवी बहुमताच्या जोरावर कारभार करणाऱ्या भाजपचा धिक्कार असो', 'संविधानाचा विजय असो', 'अजितदादा अमर रहे,' अशा घोषणा देण्यात आल्या.

शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, दत्ता धनकवडे, वैशाली बनकर, राकेश कामठे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नागरिकांच्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी कोणाच्याही दारात जाणार नाही; संविधानिक मार्गाने संघर्ष करू, असा निर्धार या वेळी राष्ट्रवादीने व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते नीलेश निकम म्हणाले, “बहुमतापेक्षा संविधान महत्त्वाचे आहे. बहुमताच्या जोरावरची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना समान हक्क दिले आहेत. केवळ आमच्यावर टीका केली म्हणून निधी हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही दादागिरी आम्ही मोडून काढू, बहुमताच्या जोरावर केलेले असे ठराव निरस्त करण्यासाठी ते राज्य शासनाकडे पाठवावेत,'' अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे निकम म्हणाले.

अमोल बालवडकर यांनी, “राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कोणी धमकी देईल, असे जन्माला आलेले नाही,” असा टोला लगावला. चंद्रकांत पाटील किंवा कोणत्याही नेत्यावर आरोप केले नसून, त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांची चौकशी करण्याची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव दिल्यानंतर उत्तर देण्याऐवजी निधीच शून्य केला जात असेल, तर यामागे काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

सुहास टिंगरे यांनी निधी कपात ही केवळ नगरसेवकांवरील कारवाई नसून नागरिकांच्या विकासावर घाला असल्याचे म्हटले. दोन प्रभागांतील सुमारे ८० हजार मतदारांच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर, ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांनी, “गेल्या ४० वर्षांत मनपाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही,” असे सांगत भाजपवर मित्रपक्षांचा केवळ निवडणुकीपुरता वापर केल्याचा आरोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT