पुणे: वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान, गीतांची मैफल, हास्यमैफल, लावणी महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पुणे नवरात्रौ महोत्सवात यंदाही पाहायला मिळणार आहे. महोत्सवाला आजपासून म्हणजेच रविवारपासून (दि. ११) सुरुवात होत आहे.
घटस्थापनेच्या दिवशी शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी विधिवत घटस्थापना होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटन कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय दुधाने, डॉ. ऋतुपर्ण शिंदे, डॉ. विजय फळणीकर, निकिता मोघे आणि वैशाली समसापूरकर यांना गौरविण्यात येईल.
महोत्सवात सोमवारी (दि. १२) मॅजिक ऑफ बर्मन्स हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम, मंगळवारी (दि.१३) बॉलीवूड ऑल टाईम हिट्स हा मराठी-हिंदी गीतांची मैफल, बुधवारी (दि. १४) 'जन्मशताब्दी स्वरवंदना' श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांच्या संगीतमय प्रवासाला मानवंदना देणारा कार्यक्रम आयोजित केला आहे.
गुरुवारी (दि. १५) 'किशोर कुमार फॉरेव्हर' हा हिंदी गीतांचा कार्यक्रम, शुक्रवारी (दि. १६) ‘मॅजिकल मेलडीज म्युझिकल ९०‘स’ ही सुरेल गीतांची सुरेल मैफल तर शनिवारी (दि. १७) हास्यमैफल हा मराठी हास्य कवी संमेलन रंगणार आहे. रविवारी (दि. १८) लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १९) ‘लतायुग’ हा गीतांची मैफल मंगळवारी (दि. २०) रोजी ‘कारवाँ सितारों का’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.