पुणे: शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये उत्साहात अन् चैतन्यपूर्ण वातावरणात रविवारी (दि. ११) शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून, रविवारी सकाळी विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे. मंदिरांमध्ये दहाही दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्युतरोषणाईने मंदिर परिसर उजळले आहे. तर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, मंदिर दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार असून, उत्सवात मंदिरांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. काही मंदिरांमध्ये परंपरेनुसार ढोल-ताशा गजरात मिरवणूकही काढण्यात येणार आहे. देवीचा जयघोष सगळीकडे दुमदुमणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी विविध मंदिरांमध्ये विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. काही ठिकाणी २४ तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वेदपठण, अभिषेक, महापूजा, आरती, भजन-कीर्तन, प्रवचन, सत्संग, सनईवादन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. नवरात्रोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सांस्कृतिक रंगांनीही सजणार आहे. काही मंदिरांमध्ये भोंडला, दांडिया-गरबा, मिरवणूक, भक्तिगीतांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा सन्मान आणि सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात उत्सवासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून, स्वच्छता, सजावट, विद्युतरोषणाई, सोयी - सुविधांकडे मंदिर प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शहरातील मंदिरांमध्ये पुढील दहा दिवस भक्ती आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
चतु:शृंगी मंदिर देवस्थान (सेनापती बापट रस्ता)
श्री देवी चतु:शृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या काळात भाविकांसाठी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे, रविवारी (दि. ११) सकाळी नऊ वाजता श्रीधर अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. देवीला मंगलस्नान, पंचामृत आणि सुगंधी द्रव्यांचा अभिषेक करण्यात येणार असून, सालंकृत पोशाखात महापूजा केली जाणार आहे. देवीला महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. पौराहित्य श्रीराम नारायण कानडे करणार आहेत. रोज सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)
तांबडी जोगेश्वरी मंदिरात रविवारी (दि. ११) सकाळी सात वाजता विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. नवरात्रोत्सवा निमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आहे.
महालक्ष्मी मंदिर (सारसबागेसमोर)
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ११) सकाळी नऊ वाजता बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सायंकाळी सहा वाजता मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाईचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे. यंदा मंदिरात ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याच संकल्पनेनुसार मंदिराचे भव्य प्रवेशद्वारही साकारण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात मंदिर दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.
भवानी देवी मंदिर (भवानी पेठ)
मंदिरात रविवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे. सकाळी सहा ते नऊ या वेळेत महारुद्राभिषेक आणि महापूजा होईल. त्यानंतर सकाळी नऊ वाजता तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी चैतन्य भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी चार ते रात्री सात यावेळेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सत्संग आयोजित करण्यात आला आहे. तसेच चिन्मय देशपांडे यांचे कीर्तन होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत रोज भजन - कीर्तन, भक्तिगीतांचे कार्यक्रम, प्रवचन, आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
वनदेवी मंदिर (कर्वेनगर)
मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रविवारी (दि. ११) सकाळी आठ ते अकरा या वेळेत विविध पथकांच्या सहभागाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर विधिवत घटस्थापना करण्यात येईल. उत्सवाच्या काळात मंदिर भाविकांसाठी दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उत्सव काळात भजन - कीर्तनासह देवीची महापूजा आणि होम हवन होणार आहेत.
काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ)
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ११) सकाळी सात वाजता भिडे कुटुंबीयांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होणार आहे. त्यानंतर मंदिर दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. नवरात्रोत्सवात दररोज सकाळी षोडशोपचार पूजा, सप्तशती पाठ आणि श्रीसूक्त पठण केले जाणार आहे. तसेच जोगवा, ललिता पंचमीला मंत्रजागर आणि अष्टमी संपताना नवचंडी होम करण्यात येणार आहे. रोज सकाळी नऊ आणि रात्री आठ वाजता आरती होणार आहे.
पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ)
मंदिरात रविवारी (दि. ११) सकाळी विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत सकाळच्या सत्रात भजन-कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, उत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
तळजाई माता देवस्थान (तळजाई टेकडी, सहकारनगर)
मंदिरात अभिषेक, आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम नवरात्रोत्सवात काळात होतील. रविवारी (दि.११) सकाळी १० वाजता विधिवत पद्धतीने घटस्थापना होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अण्णा थोरात यांनी दिली. दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.