Pune Nashik Railway Protest Pudhari
पुणे

Pune Nashik Railway Protest: पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी चक्काजाम! चाकणमध्ये आंदोलक-पोलिसांमध्ये जोरदार झटापट; नारायणगावात सर्वपक्षीय रास्ता रोको

मूळ मार्ग पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन; महामार्ग रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

पुढारी वृत्तसेवा

चाकण: पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी रविवारी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून उत्तर पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

पुणे नाशिक महामार्गावर चाकण मध्ये तळेगाव चौकात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणारे अदोलक अ पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करत महामार्गावर जाणार्या अनेक कार्यकर्त्यांची उचलबांगडी करत यांना ताब्यात घेतले. यानंतरही आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चाकण मध्ये पोलिसांनी अक्षरशः पोलीस बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना महामार्गावरून ढकलून बाजूला करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पहावयास मिळाले. सुमारे १५ मिनिट हि झटापट सुरु होती. चाकण मधील आंदोलनाचा पूर्व इतिहास पाहता पोलिसांनी कुठल्याही स्थितीत महामार्ग रोखला जाऊ नये याची याची कसोशीने खबरदारी घेतली. सुरुवातीला माणिक चौक चाकण येथे जमलेले आंदोलक पुणे नाशिक महामार्गावर येण्यास निघाल्यानंतर पोलिसांनी तळेगाव चौकात एका बाजूला सर्वाना आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना कडे घातले. आंदोलक रस्त्यावर जाऊ शकणार नाहीत याची खबरदारी घेतली.

यावेळी जोरदार झटापट झाली. अखेरीस महामार्गावर आलेल्या आंदोलकांना आमदार बाबाजी काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिसांनी आमदार बाबाजी काळे यांना आंदोलन स्थळावरून बाजूला केले. त्यानंतर आंदोलकांना महामार्गावरून बाजूला करत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. आमदार बाबाजी काळे यावेळी म्हणाले , पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या 'जीएमआरटी दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.

पुणे-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक असा मूळ मार्ग रद्द करून रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा आणि अहिल्यानगर-चाकण अशा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले आहे. या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. मूळ मार्गच कायम राहावा या मागणीसाठी चाकणपासून सिन्नरपर्यंत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्ते अडवले आहेत. आमदार काळे यांनी यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्र शासनावर सडकून टीका केली. या आंदोलनात भाजप, शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावाचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवावा, या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. ९) सकाळी नारायणगाव येथील पुणे–नाशिक महामार्गावरील बसस्थानक चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘पुणे–नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवावा’, ‘रेल्वे आमच्या हक्काची’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी नारायणगाव परिसर दुमदुमून गेला. आंदोलनामुळे पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. केंद्राच्या निर्णयाविरोधात संताप पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न राजकीय हेतूने होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. रेल्वे मार्गासाठी यापूर्वी सर्व्हे करण्यात आला असून भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्यानंतर आता जीएमआरटी दुर्बीण प्रकल्पाचा तांत्रिक मुद्दा पुढे करून मूळ मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जुन्नर तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

‘पुणे–नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याची भूमिका केंद्र शासनाने बदलली नाही, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. जुन्नर तालुक्यात कोणत्याही मंत्र्यांना अथवा शासकीय अधिकाऱ्यांना फिरकू दिले जाणार नाही,’ असा इशारा आंदोलनातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.

राजकीय जोडे बाजूला ठेवून रेल्वेसाठी एकत्र

माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, ‘जुन्नर तालुक्याच्या औद्योगिक, पर्यटन, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी या भागातून रेल्वे जाणे अत्यंत आवश्यक आहे. हायस्पीड रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला आहे. भूसंपादनाची प्रक्रियाही झाली असून त्यासाठी सुमारे ३१८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यानंतर जीएमआरटी दुर्बीण प्रकल्पाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून रेल्वेच्या मूळ मार्गात बदल करण्यात आला. यामागे राजकारण आहे.

आमदार शरद सोनवणे म्हणाले, शिवजन्मभूमीतून होत असलेल्या या आंदोलनाची केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल. राजकीय जोडे बाजूला ठेवून जुन्नरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत.

शिवजन्मभूमीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनीही रेल्वे मार्गाचा जुन्नर तालुक्याच्या विकासाशी असलेला संबंध अधोरेखित केला. रेल्वेचा मार्ग बदलल्यास तालुक्याच्या भविष्यातील औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठा फटका बसू शकतो, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष खैरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्यासह उपस्थित नेत्यांनीही रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मोबाईलद्वारे पाठिंबा

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोबाईलद्वारे आंदोलकांशी संपर्क साधून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी पुणे–नाशिक रेल्वे महत्त्वाची असून, मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

आंदोलनात आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष खैरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, नगराध्यक्ष सुजाता काजळे, भास्कर गाडगे, राजश्री बोरकर, विकास दरेकर, सुजित खैरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटे, बाबू पाटे,माऊली खंडागळे, डॉ. अनुष्का शिंदे, सुरज वाजगे, आशिष माळवदकर, संतोष वाजगे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनाचे प्रास्ताविक व नियोजन शरद दरेकर यांनी केले. सूत्रसंचालन अजित वाजगे यांनी केले. आंदोलनानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव बसस्थानक चौक आणि पुणे–नाशिक महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले होते. ‘रेल्वे मार्गासाठी पक्षभेद विसरून एकत्र’ पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून जुन्नर तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून, मूळ मार्ग कायम होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT