Pune Nashik Railway Route Pudhari
पुणे

Pune Nashik Rail Route: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे; मूळ खेड-आंबेगाव मार्ग कायम ठेवण्यासाठी राज्यस्तरावर हालचाली

जीएमआरटीचा अडथळा नाही; मुख्यमंत्री व रेल्वेमंत्र्यांना भेटून अंतिम निर्णयासाठी शिष्टमंडळ प्रयत्नशील

पुढारी वृत्तसेवा

मंचर: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा खेड-आंबेगाव-जुन्नर-संगमनेर-सिन्नर हा मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी राज्यस्तरावर हालचालींना वेग आला आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गाला जीएमआरटीचा अडथळा नाही; मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी प्रयत्न तीव्र पद्धतीने केले जाणार, अशी माहिती पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

विधानभवन मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मूळ मार्ग कायम ठेवण्यासाठी एकमताने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

याबाबत माहिती देताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागील २० वर्षांपासून या रेल्वे प्रकल्पासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती बैठकीत दिली. सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेला हा प्रकल्प व्यवहार्य ठरवून मंजुरी मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण कालावधीत प्रकल्पास जीएमआरटीचा कोणताही अडथळा निर्माण झाला नव्हता.

त्यामुळे आता हा मुद्दा पुढे करून मूळ मार्ग बदलण्याचे कारण ग्राह्य धरता येणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली. तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण देत जीएमआरटीमुळे अडचण निर्माण होणार नसल्याची बाजूही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. या बैठकीत पुणे-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर हा मूळ रेल्वेमार्ग कायम ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर मूळ मार्ग कायम ठेवण्याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

यासह येत्या काही दिवसांत नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेऊन मूळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार शरद सोनवणे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अमोल खताळ, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT