Khed Ghat Landslide Risk Pudhari
पुणे

Khed Ghat Landslide Risk: पुणे-नाशिक महामार्गावरील खेड बाह्यवळण घाटात दरड कोसळण्याची भीती

पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (NH-60) खेड (राजगुरुनगर) घाटातील बाह्यवळण रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलेल्या या बाह्यवळण घाटातील दरडी संरक्षणाचे काम अर्धवट राहिल्याने डोंगराचा कडा थेट महामार्गावर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

येथे रस्त्यालगतच्या उंच डोंगरातील मुरूम तसेच खडकाच्या एकसंध दगडी कड्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाचे पाणी त्यात मुरल्यावर हा दगड, माती मुरुमचा भाग थेट रस्त्यावर येऊ शकतो अशी सध्याची स्थिती आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संरक्षण तारा, जाळी, काँक्रिट वॉल किंवा इतर उपाययोजना करण्याची गरज वाहनचालक आणि स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

जुना खेड घाट हा पुणे-नाशिक महामार्गावरील एक महत्त्वाचा आणि वाहतूक कोंडीचा प्रमुख ठिकाण होता. तीव्र उतार, नागमोडी वळणे आणि जुन्या घाटामुळे येथे वारंवार अपघात घडुन कोंडी होत होती. या समस्या सोडवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) ने खेड घाट बाह्यवळण रस्ता सुमारे ४.४ ते ४.९ किलोमीटर लांबीचा बांधला आहे.

हा रस्ता २०२१-२०२३ दरम्यान पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ ३० मिनिटांपर्यंत कमी झाला.शिवाय अपघात, वाहतूक कोंडीतून वाहन चालक, प्रवाशांची सुटका झाली. मात्र, रस्ता डोंगरातून खोदून तयार केल्याने काही ठिकाणी डोंगराच्या कडा सुट्या झाल्या आहेत.

दरडी, माती आणि दगड यांना योग्य संरक्षण न दिल्याने समस्या निर्माण झाली आहे. या भागात दगड-मातीच्या दरडींना संरक्षण तारा किंवा काँक्रिट करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात पाणी झिरपल्याने दगड आणि माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे.

छोट्या दरडींमुळे अपघात होण्याची जोखीम वाढली आहे. हा मार्ग लहान मोठ्यांसह अवजड वाहनांसह (ट्रक्स) मोठ्या प्रमाणात वापरला जातो. दरड कोसळल्यास वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासात व्यत्यय येऊ शकतो.

खेड घाटात पूर्वीही पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या बांधकामकाळातही (२०२०) दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. NHAI आणि संबंधित विभागांनी याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे. यापूर्वीही अशा समस्यांवर पाठपुरावा झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, जेणेकरून अपघात टाळता येतील आणि प्रवास सुरक्षित होईल.

खेड बाह्यवळण रस्ता वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारला गेला. त्याचा लाभ झाला; मात्र सध्याची स्थिती पाहता सुरक्षितता दुर्लक्षित राहिली आहे. धोकादायक घटना घडण्याअगोदर उपाययोजना करण्याची गरज आहे. तसे पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, तसेच अध्यक्ष म्हाडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT