प्रसाद जगताप
पुणे: पुण्यातून धावणाऱ्या पुणे-कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी या दोन ‘वंदे भारत’ गाड्यांच्या तुलनेत पुणे-नागपूर (अजनी)-पुणे ‘वंदे भारत’ या गाडीने सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक करत सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी सुपर हिट ‘वंदे भारत’ रेल्वे ठरली आहे. याच पुणे-नागपूर (अजनी)-पुणे ‘वंदे भारत’ गाडीने अवघ्या 11 महिन्यांत पुणे विभागाच्या तिजोरीत 35 कोटी रुपयांची भर घातल्याचेही समोर आले आहे.
भारतीय रेल्वेची महत्त्वाकांक्षी आणि वेगवान ओळख असलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने पुणे विभागात आपला दबदबा निर्माण केला आहे. एप्रिल 2025 ते फेबुवारी 2026 या 11 महिन्यांत पुण्यातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या ‘वंदे भारत’ गाड्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले की, प्रवासी या सेवेला पसंती देत असून, रेल्वेच्या तिजोरीत यामुळे कोट्यवधींची भर पडली आहे.
पुणे-अजनी (26101) आणि अजनी-पुणे (26102) या दोन गाड्यांच्या एकूण 173 फेऱ्यांमध्ये प्रवासीसंख्या प्रत्येकी 1 लाख 28 हजारांच्या वर गेली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर बुकिंगचे प्रमाण अनुक्रमे 140.39 टक्के आणि 139.95 टक्के इतके नोंदविले आहे. क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग होणे, हे या मार्गावरील प्रवाशांची प्रचंड मागणी दर्शवत आहे. या गाड्यांमधून रेल्वेला सुमारे 35 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. यावरून विदर्भ-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ही लोकप्रिय गाडी ठरल्याचे दिसत आहे.
‘वंदे भारत’च्या हुबळी- कोल्हापूर मार्गाची स्थिती
पुणे-हुबळी (20670) ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसनेही चांगली कामगिरी केली असून, 87.9 टक्के बुकिंगसह रेल्वेला 7 कोटींहून अधिक महसूल मिळवून दिला आहे. कोल्हापूर मार्गावर (20673/20674) प्रवाशांचा प्रतिसाद संमिश्र असला, तरी सरासरी 60 ते 65 टक्क्यांपर्यंत बुकिंग राहिले आहे. या मार्गावरून धावणाऱ्या 143 फेऱ्यांमधून 7 ते 8 कोटींची कमाई झाली आहे.
‘वंदे भारत’ एक्स्प्रेसने प्रवासाचा वेळ कमी केल्यामुळे आणि जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्यामुळे प्रवासी या गाडीकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः पुणे-अजनी मार्गावर आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी आणखी काही नियोजन करता येईल का? याची तपासणी केली जाईल आणि प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील.हेमंतकुमार बेहेरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग