First week response Pune Nagpur Vande Bharat
पुणे: नुकतीच सुरू झालेली पुणे-नागपूर (अजनी)-पुणे (ट्रेन क्रमांक 26101) वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या सात दिवसांत साडेचार हजार प्रवाशांनी या नव्या कोर्या गाडीतून प्रवास केला. या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला 57 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे-नागपूर(अजनी)-पुणे या गाडीला मागील आठवड्यात ऑनलाइन पध्दतीने हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी सुरू व्हावी, याकरिता पुणे आणि नागपूर येथील प्रवासी संघटनांनी मागणी केली होती. (Latest Pune News)
त्याच्या पत्राची दखल घेत प्रशासनाकडून अखेर ही गाडी सुरू करण्यात आली. सध्या या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या पुणे-नागपूर वंदे भारत गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. सोमवारी तर 160 टक्के ऑक्युपेन्सी झाल्याची नोंद झाल्याचे रेल्वेच्या संगणकीय यंत्रणेवर होती. दिवाळीच्या काळातील या रेल्वेगाडीचे बुकिंगही फुल्ल झाल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले.
स्लीपर वंदे भारतची व्यवस्था करा
सध्या पुणे-नागपूर-पुणे यादरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास प्रकारात उपलब्ध आहे. पुणे-नागपूर प्रवासादरम्यान 12 ते 13 तासांचा प्रवास आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास बसून करणे अवघड होणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी ही गाडी स्लीपर कोचमध्येही सुरू करावी, अशी मागणी पुणे-नागपूर दरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांनी केली.
पुणे-नागपूर वंदे भारत...(ट्रेन क्रमांक 26101)
(दि. 11 ते 17) फेर्या - 07
उत्पन्न - 57 लाख 11,380
प्रवासी - 4,233
पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस तिकीट दर
चेअर कार - 2,040
एक्झिक्युटिव्ह क्लास-3,725
पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सात दिवसांत 4 हजार 233 प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. त्याद्वारे दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान 57 लाख 11 हजार 380 रुपये प्राप्त झाले आहे.- अनिलकुमार पाठक, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग