Pune Theatre Renovation Pudhari
पुणे

Pune Theatre Renovation: पुण्यातील महापालिकेच्या नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! दुरुस्तीची कामे सुरू

घोले रस्त्यावरील सांस्कृतिक भवन १० नोव्हेंबरपर्यंत बंद; बालगंधर्व रंगमंदिर, औंध आणि कोथरूडमधील नाट्यगृहांतही सुविधांवर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या नाट्यगृहांतील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सांस्कृतिक विभागाने देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन १० नोव्हेंबरपर्यंत देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

या कालावधीत सभागृहातील खुर्च्यांची दुरुस्ती, वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती आणि छताची गळती रोखण्यासाठी वॉटरप्रूफिंग, अशी विविध कामे केली जात आहेत. तर दुसरीकडे, बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण सुरू असून, औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरातील आवश्यक दुरुस्तीची कामेही केली आहेत. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातही देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात येत आहे. कलाकारांकडून नाट्यगृहांतील सुविधांबाबत वारंवार तक्रारी केल्या जातात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे या समस्या कितपत दूर होतात आणि सुविधांमध्ये किती सुधारणा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेच्या नाट्यगृहांमधील सुविधांबाबत कलाकारांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. स्वच्छतागृहांची अस्वच्छता, खुर्च्यांची दुरवस्था, वातानुकूलन यंत्रणेतील बिघाड आणि छतामधून पाणी गळती, अशा विविध समस्यांचा सामना कलाकारांनाच नव्हे, तर प्रेक्षकांनाही करावा लागत आहे. त्यामुळे नाट्यगृहांमधील सुविधांची नियमित देखभाल आणि आवश्यकतेनुसार वेळेत दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

१० नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन

पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील दुरुस्तीच्या कामांसाठी सभागृह १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. खुर्च्यांची दुरुस्ती, एसीची दुरुस्ती यासह विविध कामे करण्यात येत आहेत. ही कामे १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या कालावधीत सभागृहात नाट्यप्रयोगांसह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. याविषयी महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, सध्या काही नाट्यगृहांमध्ये देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात अन्य नाट्यगृहांमध्येही आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली जाणार आहे. कलाकारांना योग्य सुविधा मिळाव्यात, याला प्राधान्य दिले जात आहे.

कार्यक्रम सुरू ठेवूनच नूतनीकरणाचे काम

बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत कलाकारांकडून अनेक दिवसांपासून तक्रारी केल्या जात होत्या. त्याची दखल घेऊन स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. या कामासाठी संपूर्ण नाट्यगृह बंद ठेवण्यात आलेले नाही. नाट्यप्रयोग आणि अन्य कार्यक्रम सुरू ठेवूनच नूतनीकरणाचे काम केले जात आहेत.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या दुरुस्तीचे नियोजन

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील खुर्च्या, ध्वनिव्यवस्था, रंगमंच आणि व्हीआयपी कक्षाशी संबंधित दुरुस्तीची कामे नियोजित आहेत. या कामांसाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे दुरुस्ती कधी सुरू करायची, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि त्याचा नाट्यप्रयोग आणि अन्य कार्यक्रमांच्या आयोजनावर किती परिणाम होईल, याबाबत विषयांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे राजेश कामठे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT