पुणे: बालगंधर्व रंगमंदिर, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट), यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) अन् नव्याने बांधण्यात आलेले विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर) ही नाट्यगृहे चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करणारी नाट्यगृहे ठरली आहेत. मात्र, दुसरीकडे उपनगरांतील नाट्यगृहांना गेल्या अकरा महिन्यांत अपेक्षित उत्पन्नही गाठता आलेले नाही. त्यामुळे उपनगरांतील नाट्यगृहांची कमाईची स्थिती ‘जैसे थे’च असून, सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर नाट्यगृहाने तर फक्त 1 लाख 34 हजार 280 रुपयांची कमाई केली आहे.
शहर आणि उपनगरांत महापालिकेची 15 नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे आहेत. गेल्या अकरा महिन्यांत महापालिकेच्या नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांकडून अंदाजपत्रकानुसार 4 कोटी 43 लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना आत्तापर्यंत फक्त 3 कोटी 9 लाख 94 हजार 068 रुपयांचे उत्पन्नच सांस्कृतिक विभागाला मिळाले आहे. 1 मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026 या काळात बालगंधर्व रंगमंदिराने 66 लाख 42 हजार 519, यशवंराव चव्हाण नाट्यगृहाने 56 लाख 43 हजार 551, श्री गणेश कला क्रीडा रंगमंच नाट्यगृहाने 44 लाख 40 हजार 219 आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाने 40 लाख 60 हजार 677 रुपयांची कमाई करून पसंती मिळवली आहे. पण, त्यातुलनेत उपनगरातील नाट्यगृहांच्या कमाईचा आकडा खूप कमी आहे. काही नाट्यगृहांनी तर फक्त 1 ते 3 लाख रुपयांची कमाई केली आहे.
कमी कमाई करणारी नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर (येरवडा): 10 लाख 63 हजार 975
पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध): 10 लाख 45 हजार 872
शिवसेनाप्रमुख व्यंग्यचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन: 9 लाख 28 हजार 157
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक): 4 लाख 99 हजार 295
सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन (भवानी पेठ): 3 लाख 38 हजार 665
मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क): 1 लाख 63 हजार 245
विजय तेंडुलकर नाट्यगृह (सहकारनगर): 1 लाख 34 हजार 280
पंडित भीमसेन जोशी कलादालन (सहकारनगर): 62 हजार 688
कमाई करणारी नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रे
(1 मार्च 2025 ते 31 जानेवारी 2026)
बालगंधर्व रंगमंदिर: 66 लाख 42 हजार 519
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड): 56 लाख 43 हजार 551
श्री गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट): 44 लाख 40 हजार 218
विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर): 40 लाख 60 हजार 677
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह (बिबवेवाडी): 27 लाख 54 हजार 704
महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी): 16 लाख 45 हजार 848
पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी (घोले रस्ता): 15 लाख 70 हजार 374
उपनगरांतील नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या नाट्यगृहांबाबत आयोजकांना माहिती देण्यासह त्यांना नाट्यगृहात कार्यक्रम करण्याविषयी प्रोत्साहितही करीत आहोत. आता काही नाट्यगृहांना प्रतिसाद मिळू लागला आहे. नाट्यगृहांच्या उत्पन्नवाढीसाठीही आम्ही विविध योजना राबवीत आहोत. नाट्यगृहांमधील वाहनतळ आणि कॅन्टीनबाबतची निविदा काढून ते भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे आणि त्यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार आहोत.राजेश कामठे, मुख्य व्यवस्थापक, महापालिका नाट्यगृह विभाग