Schools Pudhari
पुणे

Pune Municipal Schools Proposal: पुणे महापालिकेच्या 5 शाळा खासगी संस्थेकडे; 100 कोटींच्या प्रस्तावावरून वाद

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या व्यवस्थापनासाठी नऊ वर्षांचा प्रस्ताव; शिक्षण क्षेत्रात चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने 'स्थायी समिती'समोर मंजुरीसाठी ठेवला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासह सर्व शालेय साहित्य महापालिकेकडून पुरविण्यात येत असतानाही प्रत्येक विद्यार्थ्यांमागे २५ हजार रुपये या संस्थेला देण्यात येणार आहेत. नऊ वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली पालिकेच्या शाळांचा कसा बाजार मांडला, हे समोर आले आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागांतील इंग्रजी माध्यमांच्या पाच शाळा २००७ पासून 'द आकांक्षा फाउंडेशन' या संस्थेकडून खासगी सहभागी तत्त्वा‍वर चालविण्यात येत आहेत. या शाळांच्या इमारती, विद्युतव्यवस्था, भौतिक सुविधा तसेच डीबीटी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य महापालिकेकडूनच पुरविले जाते, तर शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च संबंधित संस्था सीएसआर निधीतून करते. मात्र आता सीएसआरचा निधी मिळविण्यास अडचणी येत असल्याचे कारण देत या संस्थेने महापालिका आयुक्तांकडे निधीची मागणी केली होती. त्यावर आयुक्तांनी तत्परता दाखवली. फक्त याच संस्थेला निधी दिता जातोय, हे दिसू नये, यासाठी या पाच शाळा चालविण्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवली.

दोन्ही वेळेस केवळ 'द आकांक्षा फाउंडेशन' या संस्थेचीच निविदा आली. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे २७ हजार रुपये इतका दर या संस्थेने दिला होता. मात्र, अंदाजपत्रकात ११ कोटींची तरतूद असल्याने संस्थेशी चर्चा करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी २५ हजार दर निश्चित केला. त्यानुसार साडेचार हजार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे नऊ वर्षासाठी देण्याचा प्रस्ताव स्थायीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

अंदाजपत्रकात ११ कोटींच्या तरतुदीची खेळी

द आकांक्षा फाउंडेशन या संस्थेला शाळा चालविण्यास देण्याचे नियोजन किती पद्धतशीर करण्यात आले होते, हे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीवर स्पष्ट होत आहे. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात संबंधित संस्था चालवत असलेल्या शाळांमध्ये महत्त्वा‍ची कामे करण्याच्या बजेट हेडखाली ११ कोटींची तरतूद करून ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, त्याच हिशेबाने निविदाही आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडूनच पद्धतशीरपणे या संस्थेला काम देण्याचा घाट घातला गेला असल्याचे स्पष्ट होत आहे.

फेरविचाराचा ठराव मांडणाऱ्यांची भाजप पदाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी

द आकांक्षा फाउंडेशन ही संस्था भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी शाळा चालविण्यास देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंज़ुरीसाठी आल्याचे निदर्शनास आणले. तसेच, हा प्रस्ताव कसा चुकीचा असल्याचे सांगितले. त्यावर शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करून तो शिक्षण समितीपुढे मांडावा, असा ठराव मंजूर केला. हा ठराव मंजूर झाल्याचे समजताच भाजपच्या पालिकेतील एका बड्या पदाधिकाऱ्याने ठराव करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हा वरिष्ठ नेत्यांचा प्रस्ताव असल्याची कल्पना दिली असतानाही तुम्ही फेरविचाराचा ठराव कसा केला? अशी विचारणा करीत त्याची कानउघाडणी केल्याची चर्चाही पालिकेत रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT