पुणे : तब्बल आठ वर्षांनी मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी 41 प्रभागांच्या आरक्षणाची सोडत झाली. गणेश कला क्रीडा केंद्रात जणू महापालिका अधिकारी अन् इच्छुकांची शाळाच भरली होती. सकाळपासून लागलेली उत्कंठा दुपारी एक वाजता संपली. आरक्षणाचे ड्रॉ हे अकरा शालेय विद्यार्थांनी काढले अन् गर्दीने गजबलेले गणेश कला क्रीडा केंद्र काही वेळामध्ये रिकामे झाले आणि महापालिका कर्मचारी, बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.(Latest Pune News)
गेल्या दोन दिवसांपासून गणेश कला क्रीडा केंद्राच्या परिसरात महापालिकेच्या वतीने महापालिका आरक्षण सोडतीची तयारी सुरू केली होती. भव्य अन् वातानुकूलित अशा या सभागृहाच्या बाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. सभागृहाबाहेर गर्दी होणार, याचा अंदाज घेत बाहेरच्या पटांगणात भला मोठा पडदा लावण्यात आला होता. आलेल्या प्रत्येकाला सोडतीचा कागद देण्यासाठी टेबल मांडण्यात आले होते. मनपाचे कर्मचारी अधिकारी तेथे तैनात होते.
पहिली सोडत अन् टाळ्या...
सकाळी 11.15 वाजता श्रेयश विष्णू पवार या विद्यार्थांने अनुसूचित जाती महिलांसाठी ड्रॉ काढला. तो प्रभाग क्रमांक 12 अ नंतर नंदीनी शिवचरण हिने 7 अ, हसन शेख याने 32 अ, मीना शेख हिने 1 अ, अभिषेक कुंभार याने 28 अ, अलीया मुलांनी हिने 14 अ, दिग्विजय चव्हाण याने 41 अ प्रभागाची सोडत जाहीर केली अन् टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुले लाजली, बुजली, नंतर खुलली...
संत तुकाराम विद्यालयातील सहावीच्या वर्गातील 11 विद्यार्थी या सोडतीसाठी आले होते. यात सहा मुली अन पाच मुलांचा समावेश होता.सुरुवातीला गर्दीने खचाखच भरलेल्या इच्छुक उमेदवारांसमोर सोडतीची चिठ्ठी उंचावून दाखवताना मुले लाजली, बुजली नंतर मात्र जसजसे ड्रॉ वारंवार काढले तसे ते खुलले. नंतर स्वतः पुढे येत नाव सांगत त्यांनी ड्रॉ काढले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते दप्तरांचे वाटप करण्यात आले.
महापालिका निवडणुका 2017 नंतर प्रथमच होत असल्याने इच्छुकांच्या गर्दीचा अंदाज घेऊनच सभागृहाबाहेर बंदोबस्त अन् आतील सोडतीचे लाईव्ह प्रक्षेपण बाहेर पडद्यावर दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सभागृह सकाळी 10 वाजताच भरून गेले, मात्र अनुसूचित जाती, महिला प्रवर्गाची सोडत जाहीर होताच 80 टक्के सभागृह दुपारी बारा वाजताच रिकामे झाले.
काय होईल अन् कसं होईल, नुसती धाकधूक!
गणेश कला क्रीडा केंद्रात सकाळी 8 पासूनच पोलिस बंदोबस्त होता.
हा परिसर शाळेसारखाच सजला होता. निवडणुकीला इच्छुक
असणाऱ्यांची गर्दी मंगळवारी सकाळी 9 पासूनच सुरू झाली.
चारचाकी, दुचाकी वाहनांनी परिसर भरून गेला. मात्र पार्किंगची व्यवस्था दूर केल्याने हा परिसर स्वच्छ अन् टापटीप ठेण्यात आला होता. मनपा कर्मचारी इच्छुकांच्या हातात आरक्षण सोडतीची माहिती देणारा कागद उत्साहाने देत होते. यात महिला इच्छुकांची गर्दी लक्षणीय होती.
सकाळी 10 वाजता सभागृह हाऊसफुल्ल झाले. सर्वच इच्छुकांनी कागद, पेन आणला होता. मात्र ड्रॉ जस जसे वेगाने जाहीर झाले तस तसे मात्र भल्या मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या प्रभाग आरक्षणाचे फोटो काढण्यासाठी मोबाईल उंचावले अन् एकच क्लिक क्लिकाट झाला.
सोडत दुपारी 1 वाजून 17 मिनिटांनी संपली तोवर सर्व सभागृह रिकामे झाले तोच पत्रकारांनी आपला मार्चो थेट व्यापीठावर मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या दिशेने वळविला. त्यांच्या खुर्चीला चहुबाजूंनी गरडा पडला तोच सर्व सुरक्षारक्षकांचा पहारा पत्रकारांभोवती पडला. आयुक्त राम यांच्या शर्टला सात ते आठ मायक्रोफोन जोडले जात होते. ते म्हणाले, ’इतने सारे मायक्रोफोन...’ त्यावर पत्रकार उत्तरले... ’सर अगल अलग चॅनल के अलग है...’ आयुक्त राम यांनी सोडतीची माहिती दिली. प्रश्नांच्या भडिमाराला त्यांनी सावध उत्तरे दिल्यावर ते गमतीने म्हणाले, ’ये सारे मायक्रोफोन अब मेरे हो गये, मैं इन्हें ले जाऊंगा.’ त्यावर एकच हंशा पिकला... थंडी, स्वेटर अन् चहा....