पुणे: महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा करण्याची जबाबदारी असलेल्या कर आकारणी व करसंकलन विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी सध्या निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आल्याने विभागाच्या नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. 'निवडणूक एसआयआर २०२६'च्या विशेष निवडणूक कामकाजासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने मालमत्ता कराशी संबंधित विविध अर्ज, सेवा आणि प्रशासकीय कामांचा निपटारा करण्यास विलंब होत आहे.
निवडणूककामासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने करसंकलन विभागातील दैनंदिन कामकाजाचा वेग मंदावला आहे. मालमत्ता करासंदर्भातील कामांसाठी महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत असून, विविध सेवा आणि अर्ज पूर्ण होण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत महापालिका प्रशासनाने नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून नागरिकांना शक्य तितक्या तत्परतेने सेवा देण्यासाठी विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 'निवडणूक एसआयआर २०२६'चे कामकाज पूर्ण झाल्यानंतर कर आकारणी व करसंकलन विभागातील नियमित कामकाज पूर्ववत करण्यात येणार आहे. तोपर्यंत सेवा देताना होणारा विलंब टाळण्यासाठी उपलब्ध कर्मचारी व मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर केला जात आहे.
नागरिकांना दिलासा कधी?
करसंकलन विभागातील मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामावर
मालमत्ता कराशी संबंधित अर्जांच्या निपटाऱ्यास विलंब
विविध करसेवा व प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावला
उपलब्ध मनुष्यबळातून सेवा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न
निवडणूक काम पूर्ण झाल्यानंतर नियमित कामकाज पूर्ववत होणार
'निवडणूक एसआयआर २०२६'च्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने नियमित कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. नागरिकांना होणाऱ्या विलंबाबद्दल प्रशासन दिलगीर आहे. उपलब्ध मनुष्यबळातून सेवा शक्य तितक्या तत्परतेने देण्याचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य व संयम बाळगावा.रवी पवार, कर आकारणी व करसंकलन विभागप्रमुख, महापालिका