Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Municipal Property Issue: पुण्यात 4,188 मालमत्तांची नोंद गायब; टँकर गैरप्रकारांवर पालिकेचा दंडाचा इशारा

प्रॉपर्टी कार्डमध्ये मोठी त्रुटी उघड; पाणीपुरवठ्यात पैसे उकळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महानगरपालिकेच्या मालकीच्या हजारो मिळकतींबाबत गंभीर त्रुटी समोर आली आहे. तब्बल 4 हजार 188 मालमत्तांची प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेच्या नावाने नोंदच नसल्याचे उघड झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संबंधित मिळकतींवर अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नगरसेविका तन्वी देवकर यांनी याबाबत स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाकडून प्रश्नोत्तराद्वारे महापालिकेच्या मालमत्तांची सविस्तर माहिती मागविली होती. त्यावर मालमत्ता विभागाने दिलेल्या लेखी उत्तरातून ही बाब समोर आली असून, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याशिवाय, महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची माहिती उपलब्ध करून देणारे अधिकृत संकेतस्थळ मागील तीन वर्षांपासून बंद असल्याचेही निदर्शनास आले आहे. या कारणामुळे तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मिळकतींची योग्य नोंद ठेवणे आणि त्यांच्यावर देखरेख करणे शक्य झाले नसावे, असेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर तन्वी देवकर यांनी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. महसूल विभागात कामाचा अनुभव असलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करून महापालिकेच्या सर्व मिळकतींची प्रॉपर्टी कार्डवर नोंद करावी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

नागरिकांकडून पैसे मागणाऱ्या टँकर चालक, मालकांवर कारवाई करणार

शहरातील काही भागांमध्ये महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना नागरिकांकडून पैसे उकळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. टँकर चालक किंवा मालकांनी पाणीपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे मागू नयेत, तसेच नागरिकांनीही अशा मागण्यांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी केले आहे.

यासोबतच, नियमांचे उल्लंघन करून नागरिकांकडून पैसे घेणाऱ्या टँकर चालक किंवा मालकांवर 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या काळात पाण्याची टंचाई वाढत असल्याने काही भागांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही टँकर चालक व मालक नागरिकांकडे पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. गरजेमुळे अनेक नागरिक पैसे देतात, तर काही ठिकाणी यावरून वाद निर्माण होत असल्याचेही समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. टँकर चालक किंवा मालकांकडून पैशांची मागणी झाल्यास संबंधित पुराव्यासह छायाचित्र व्हॉट्‌‍सॲप क्रमांक 9689900002 वर पाठवावे, असेही नंदकुमार जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT