आशिष देशमुख, सुनील जगताप, निनाद देशमुख, प्रसाद जगताप
पुणे: शहरात महापालिकेच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध सुशोभीकरणाच्या कामांना राजकीय पदाधिकाऱ्यांकडून स्वतःच्या नावाचे श्रेय घेण्याचा प्रकार वाढलेला दिसत आहे. रस्त्यालगतच्या भिंतीवर, ऐतिहासिक प्रतिकृती, बाकडी, स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामांसोबतच संबंधित नगरसेवक, आमदार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे ठळकपणे झळकत असल्याचे चित्र आहे. फोटोतील भिंतीवरील फलकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रा, स्वच्छतेचे संदेश आणि त्यासोबत लोकप्रतिनिधींची नावे दिसतात. एका ठिकाणी महापालिकेच्या रुग्णालयाचे नावही दिसते. मात्र. या कामांचा खर्च नेमका महापालिकेच्या तिजोरीतून होत असेल, तर त्याचे श्रेय वैयक्तिक किंवा पक्षीय पातळीवर घेणे कितपत योग्य आहे ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या सार्वजनिक कामांवर 'महापालिका निधीतून' अशी स्पष्ट माहिती देण्याऐवजी राजकीय व्यक्तींची नावे ठळक करण्याची पद्धत पारदर्शकतेच्या आणि सार्वजनिक निधीच्या योग्य वापराच्या प्रश्नांना जन्म देते. शहरभर उभ्या राहणाऱ्या अशा 'श्रेयाच्या पाट्या' थांबवून काम करणाऱ्या संस्थेचे श्रेय नागरिकांना दिसावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागात चौका-चौकांत सुशोभीकरणाच्या नावाखाली कट्टे, बस थांबे, आसन, शिल्पे, स्वच्छतागृहे तसेच गणेश मंडळांच्या मंदिरांसाठी आमदार, खासदार यांच्या सौजन्याने अथवा मदतीने विकासकामे साकारण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षात मध्यवर्ती भागात असणाऱ्या दैनंदिन समस्या, वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्यांनी स्थानिक ग्रासले असून, या सार्वजनिक निधीचा वापर नेमका शहराच्या गरजांसाठी होतो आहे की, राजकीय श्रेयासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मध्यवर्ती पेठांमधील सोमवार पेठ, रविवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ हा वार्ड क्रमांक १५ मधील भागांत दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधींना पाहणी केली असता, हे वास्तव समोर आले आहे. शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम येथे स्थानिक आमदारांच्या प्रयत्नातून ज्येष्ठांसाठी आसन कट्टा तयार करण्यात आला आहे. तसेच, शारीरिक संदेश देण्यासाठी मल्लांचे पुतळेही या ठिकाणी बसवून सुशोभीकरण केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या कट्ट्यापुढे व्यावसायिक वाहनांचे अतिक्रमण होत आहे. या परिसरातून सदाशिव पेठ, नाना पेठेकडे जाताना रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि होणारी वाहतूक कोंडी याकडे मात्र आमदार महोदयांचे सर्रास दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. अशीच अवस्था नारायण पेठ, लक्ष्मी रस्त्यांवरील चौकांमध्ये असून ऐतिहासिक दाखले देणारी शिल्पे, बसण्यासाठी बाकडे आणि बसथांब्यांवरील नामफलक लक्ष वेधून घेत आहे. मात्र, याच परिसरात कचरा समस्या, अस्वच्छता, पदपथांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभावही दिसून येतो.
पुणेकरांच्या निधीतून माननीयांची फुकट चमकोगिरी
सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा ही सोयीपेक्षा अधिक डोकेदुखीची ठरत आहे. दैनिक 'पुढारी'ने केलेल्या विशेष पाहणीत सिंहगड रोडवरील बस थांब्यांची विदारक अवस्था समोर आली आहे. या रस्त्यावरील जवळपास प्रत्येक बसथांबा राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींच्या गर्दीत पार झाकोळला गेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, विविध ब्रँड्सच्या विक्रीच्या जाहिराती आणि फ्लेक्समुळे बसथांब्याचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक थांब्यांवर संबंधित बसथांब्याचे नाव आणि तेथून सुटणाऱ्या बसच्या मार्गांची (रूट) माहिती देणारे साधे फलकही उपलब्ध नाहीत. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या आणि विशेषतः नव्याने येणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. सार्वजनिक मालमत्तेवर स्व-श्रेयाची दप्तर...फक्त बसथांबेच नव्हे, तर चौकांचे नामफलक आणि सार्वजनिक सुविधांवरही स्वतःचे नाव आणि 'संकल्पना' कोरण्याची चढाओढ पाहायला मिळत आहे.
विठ्ठलवाडी चौक महापालिका प्रशासनाच्या सार्वजनिक स्वच्छतागृहावर एक आकर्षक मोठी फरशी लावून त्यावर 'मंजूषा नागपुरे यांची संकल्पना' असा उल्लेख केला आहे. पालिका निधीतून उभारलेल्या सुविधेवर वैयक्तिक नाव टाकल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. माणिकबाग चौक ब्रह्मा हॉटेलसमोरील चौकाला 'कै. पै. रावसाहेब गोविंद उर्फ आप्पासाहेब मोरे चौक' असा नामफलक लावला असून, त्यावर ''संकल्पना : नगरसेवक श्रीकांत शशिकांत जगताप' असे स्पष्टपणे लिहिले आहे.
बाकड्यांवरही नाव कोरण्यासाठी चढाओढ
शहरातील बसथांबे, महापालिकेचे पूल, नागरिकांसाठीचे बेंच, ओपन जिम आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे यांसारख्या शेकडो सार्वजनिक सुविधांवर 'अमुक तमुक नगरसेवक, आमदार किंवा खासदार यांच्या सौजन्याने' अशी नावे झळकणे आता फॅशन बनली आहे. प्रत्यक्षात यासाठीचा खर्च महापालिका किंवा राज्य शासनाचा असतो. श्रेय मात्र या लोकप्रतिनिधींकडून लाटले जात आहे.
हडपसर, मांजरी, शेवाळवाडी, मगरपट्टा आणि माळवाडी या परिसरामध्ये हा प्रकार अक्षरशः अतिरेकी पातळीवर पोहोचला आहे. जनतेच्या घामाच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांवर स्वतःची नावे कोरून ही मंडळी जणू काही स्वतःच्या खिशातून हा खर्च केल्याचा आव आणतात. विशेषतः हडपसर आणि मगरपट्टा भागातील बसथांबे आणि उद्यानांमधील दिशादर्शक फलकांवर राजकीय नेत्यांच्या नावांचे फलक इतके मोठे असतात की, मूळ सुविधेचा उद्देशच झाकोळून जातो. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत हा सुरू असलेला करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आणि विनाकारण प्रसिद्धीचा सोहळा अत्यंत संतापजनक आहे.
प्रशासनाचा अंकुश सुटल्यामुळेच राजकीय पुढारी सार्वजनिक मालमत्तेला आपली खासगी मालमत्ता समजत आहेत. रस्त्यावरील दिशादर्शक फलक आणि नागरिकांना बसण्यासाठी टाकण्यात आलेले लोखंडी व सिमेंटचे बेंचेस पूर्णपणे राजकीय जाहिरातींचे केंद्र बनले आहेत. 'अमुक तमुक यांच्या निधीतून' किंवा 'सौजन्याने' असे लिहून प्रत्येक बाकावर स्वतःचे नाव कोरण्याची चढाओढ दिसून येते.
आमदार-खासदारांना उपलब्ध असलेल्या निधीतून स्थानिक पातळीवरील कामे करता येतात. मात्र, पुणेकरांना अपेक्षित असलेल्या मोठ्या नागरी प्रश्नांवर या निधीचा किती परिणामकारक वापर होतो आहे, याचे सार्वजनिक मूल्यमापन होणे गरजेचे असल्याचा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधांवर लोकप्रतिनिधींचे नाव झळकण्यापेक्षा त्या सुविधांचा दर्जा, उपयोगिता आणि शहराच्या गरजांशी असलेला संबंध महत्त्वाचा आहे. पुण्याच्या विकासाचा मापदंड नामफलक नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानातील प्रत्यक्ष सुधारणा असायला हवी.एक सजग नागरिक