Pune Municipal Election 2025 Code Of Conduct Voting Date
पुणे: राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी दि. 31 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिल्याने त्यानुसार दि. 15 डिसेंबरच्या जवळपास निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन दि. 20 जानेवारीनंतर प्रत्यक्षात मतदानाचा कार्यक्रम होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातच महापालिका निवडणुकांच्या धुरळ्याने होणार असल्याचे स्पष्ट आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका सहा महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने महापालिका निवडणुकांसाठी जून महिन्यांत चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेत प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. (Latest Pune News)
त्यानुसार येत्या दि. 6 ऑक्टोंबरपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सहा महिन्यांत निवडणुका घेणे शक्य होत नसल्याने राज्य सरकारने न्यायालयाकडे मुदतवाढीची विनंती केली होती. त्यानुसार आता न्यायालयाने दि. 31 जानेवारीपर्यंत 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे.
दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य महापालिकांच्या निवडणुका प्रत्यक्षात जानेवारीमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.याबाबत वरिष्ठ प्रशासकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका व नगरपरिषद यांच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकांच्या निवडणुकीचे नियोजन असणार आहे.
त्यानुसार दि. 15 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकींची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे, तर प्रत्यक्ष मतदान हे दि. 21 ते 22 जानेवारीच्या जवळपास असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना तयारीसाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
पुणे महापालिकेची 10 ऑक्टोबरला आरक्षण सोडत
पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना येत्या दि. 6 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार आहे. त्यानंतर दि. 10 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्येक प्रभागानुसार मतदार याद्या निश्चित करण्याचा कार्यक्रम होणार असून, दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मतदार याद्यांचे काम पूर्ण होईल. म्हणजेच महापालिकेच्या बाजूने निवडणुकीची शंभर टक्के तयारी पूर्ण होणार आहे.