पुणे: सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावणारी, मित्र-मैत्रिणींसोबत मतदानासाठी आलेली, मतदान केल्यानंतर आनंदाने सेल्फी, छायाचित्रे टिपणारी अन् मतदानानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या तरुणाईने गुरुवारी (दि. 15) मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यांमध्ये सर्वाधिक संख्या 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांची. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. नवख्यांच्या जोडीला अनुभवी तरुणांनाही मतदानाचा सर्वश्रेष्ठ अधिकार बजावत पुण्याच्या विकासात योगदान दिले. प्रत्येकाने मोठ्या आत्मविश्वासाने मतदान केले. तरुणाईचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महापालिकेच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया गुरुवारी (दि. 15) पार पडली. महाविद्यालयीन विद्यार्थी असो वा नोकरदार... व्यवसाय करणारे असो वा कला क्षेत्रात काम करणारे... प्रत्येकाने पुढाकार घेऊन मतदानासाठीचे कर्तव्य बजावले. तसेच, मतदान केल्यानंतरचे सेल्फी आणि छायाचित्रेही फेसबुक, इन्स्टाग््राामवर पोस्ट केले. प्रत्येकाने खास संदेश लिहून सोशल मीडियावर मतदान केल्याचा आनंद बोलता केला. तसेच, काहींनी रिल्स आणि व्हिडिओही शेअर केले. प्रत्येक केंद्रावर मतदान करणाऱ्यांमध्ये नवमतदारांची संख्या मोठी होती. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणाच्या चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकाने आपला अनुभव आणि छायाचित्र सोशल मीडियावरही शेअर केला.
तरुण मतदार तन्मयी शिंदे म्हणाली, ‘मतदान हा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. त्यामुळे हा अधिकार बजावताना खूप आनंद झाला. मी कुटुंबीयांसमवेत मतदानासाठी आले होते. त्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. मतदान केल्याने आपण देशाप्रतीची जबाबदारी पार पाडल्याची अनुभूती मिळाली.’ वानवडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणारी किंजल पडवळ म्हणाली, ‘मतदान करणे खूप गरचेचे आहे, याच विचाराने मतदानासाठी आले होते. मी दुसऱ्यांदा मतदान केले आहे आणि चांगले उमेदवार निवडून यावे, यासाठी मतदान केले. पुण्याच्या विकासासाठी हे खूप आवश्यक आहे. पालिकेच्या निवडणुकीत माझ्यासारख्या इतर तरुणांना मतदान करताना पाहून खूप आनंद झाला. आयटी कंपनीत काम करणारा शुभम म्हणाला, मतदानाच्या दिवशी आम्हाला सुटी नव्हती. त्यामुळे कामातून काही तासांचा वेळ काढून मतदानासाठी आलो होतो. आपले कर्तव्य म्हणून मी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्याने आपण देशासाठी काहीतरी केल्याची भावना मनात होती.
मतदानासाठी आल्या एकत्र
प्रभाग क्र. 18 वानवडी - साळुंखे विहार येथील मतदान केंद्रावर मैत्रिणी एकत्रितपणे मतदानासाठी आल्या होत्या. मतदानाचा सर्वश्रेष्ठ हक्क बजावत त्यांनी देशाप्रती असलेले कर्तव्य बजावले. रूपाली सपकाळ, स्वाती माने, शर्मिला पाटील, प्रिया परदेशी आणि मोहिनी दीक्षित यांनी मतदानाचा हक्क बजावला.
महापालिकेच्या निवडणुकांसाठी मी पहिल्यांदाच मतदान केले आणि एकदम जबाबदार नागरिक झाल्याची भावना निर्माण झाली. महापालिकेत निवडून येणारा लोकप्रतिनिधी आपल्या परिसरातील कामांना प्राधान्य देणारा आणि नागरिकांच्या समस्या सोडवणारा असावा, असे वाटते.गायत्री पंडित, रहिवासी, धायरी
मी विधानसभेनंतर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केले. शहराच्या विकासासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवकांची आवश्यकता आहे. मतदान करताना योग्य उमेदवाराचा विचार करून मी मतदान केले.प्रणाली शेंडगळे, नवमतदार
पहिल्यांदा मतदान करण्याची खूप उत्सुकता आहे. याच उमेदवाराला मत द्या, त्यालाच द्या, असे सगळीकडून ऐकायला मिळत आहे. आमिषे दाखवली जात आहेत. मात्र, मतदारांनी या गोष्टींना न भूलता आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येऊ शकेल, आपल्या परिसराचा आणि पर्यायाने देशाचा विकास करू शकेल, अशा उमेदवारांना मतदान करुन जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, असे मला वाटते.सानिका मोहिते, रहिवासी, शिवणे
मी डेक्कन जिमखानाच्या प्रभागातून गरवारे महाविद्यालय येथे पहिल्यांदा मतदान केले. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. मला मतदान केल्याचा खूप आनंद झाला.अनिष डोईफोडे रहिवासी, डेक्कन जिमखाना