पुणे: महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या अखेरच्या रविवारची संधी साधत शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आज झंझावाती प्रचार करीत प्रभाग पिंजून काढले. मतदारराजा घरीच असल्याने रविवारी त्यांना गाठून सर्वांनीच आपापले जाहीरनामे त्यांच्यापर्यंत पोहोचविले. एकूणच रविवार पुणेकरांसाठी राजकीय दंड-बैठकांचा ठरल्याचे दिसून आले.
तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त प्रत्येक प्रभागात चौरंगी, पंचरंगी लढती रंगल्या आहेत. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावत रविवारी सजूनधजून फटाक्यांच्या तोफा उडवत विजयी झाल्याच्या थाटात रॅली काढल्या. त्यामुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी अनुभवयास येत होती. दुचाकी, चारचाकीवर पक्षांचे झेंडे व निवडणूक चिन्हे घेऊन प्रचारक तसेच उघड्या जीपमध्ये फेटे बांधून सजलेले उमेदवार मतदारांना अभिवादन करत होते. असेच चित्र शहरातील सर्व प्रभागात दिसून येत होते. मतदानाला अवघे चार दिवस उरले असून, 13 जानेवारीला प्रचाराची सांगता असल्याने हा रविवार प्रचाराचा सुपर संडे ठरला.
कोथरूडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची रॅली
कोथरूडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. कोथरूड परिसरातील भाजपचे सर्व उमेदवार टप्प्याटप्प्याने त्यामध्ये सहभागी झाले. कोथरूडच्या सराफी बाजार, भाजी मंडई, शिवाजी पुतळा परिसर, मयूर कॉलनी आदी परिसर या प्रचार रॅलीने दणाणून सोडला.
शिवसेना (उबाठा) व काँग््रेास आघाडीची शास्त्री रस्त्यावर भव्य रॅली
शिवसेना व कॉंग््रेास आघाडीच्या उमेदवारांनी दुपारी दांडेकर पूल, राजेंद्र नगर, शास्त्री रस्ता, लोकमान्यनगर, आंबिलओढा कॉलनी भागातून दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. सजविलेल्या उघड्या जीपमध्ये फेटे बांधून उभे असलेल्या उमेदवारांनी दुकानदार तसेच मतदार नागरिकांना अभिवादन करून त्यांच्याशी संपर्क साधला. या रॅलीवर ब्लोअरद्वारे रंगीबेरंगी कागदांच्या तुकड्यांचा वर्षाव सुरू असल्याने रॅलीत वेगळाच उत्साह संचारलेला दिसला.
सिंहगड रस्ता परिसरात मतदारांशी संपर्क
सिंहगड रस्ता, नांदेड सिटी, खडकवासला भागातही मोठमोठ्या प्रचार फेऱ्या काढलेल्या दिसल्या. राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांबरोबर अपक्षांनीही मतदारांशी संपर्क साधला. नांदेड सिटीसारख्या मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये प्रवेश मिळविताना उमेदवार व कार्यकर्त्यांना परवानगीचे सोपस्कार पार पाडावे लागत होते. तरीही सर्वांनी आपली परिचयपत्रके मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसला. आपल ठरलयं, कपाट फिरलयं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाही येथे ऐकायला मिळाल्या.
उमेदवारांचा घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर
प्रभाग क्रमांक 23 मध्ये नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, गणेश पेठ, भवानी पेठ आणि शुक्रवार पेठेतील एक गल्ली या भागाचा रविवारपेठ-नानापेठ प्रभागात यंदा समावेश आहे. या प्रभागातील मतदारांना साद घालण्यासाठी उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचा चांगला वापर केल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारांनी घरोघरी जात मतदारांना यापूर्वी केलेले कार्य तसेच यापुढील काळात करणाऱ्या कामांचे पॅम्प्लेटचे वाटप करत मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी चिन्हाचेदेखील महत्व उमेदवारांकडून सांगण्यात येत होते. रिक्षांच्या माध्यमातून, एलईडी स्क्रिन तसेच कोपरा सभेच्या माध्यमातून उमेदवार प्रचार करत असल्याचे दिसून आले. प्रचार करण्यासाठी मंगळवारचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रभागातील कोपरा न कोपरा पिंजून काढत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यावर उमेदवारांचा भर असल्याचे पाहायला मिळत आहे.
गोखलेनगरने अनुभवला प्रचाराचा झंझावात
रिक्षावर वाजणारे प्रचार गीत अन् ऑडिओ क्लिप्स, मतदारांच्या भेटीगाठी घेणारे उमेदवार, ठिकठिकाणी निघालेल्या प्रचार फेऱ्या अन् यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले कार्यकर्ते असे चित्र रविवारी (दि. 11) प्रभाग क्रमांक - 7 गोखलेनगर - वाकडेवाडी येथे पाहायला मिळाले. रविवारी उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. गोखलेनगर, सेनापती बापट रस्ता, मुळा रस्ता, वाकडेवाडी आदी ठिकाणी प्रचार करणारे उमेदवार दिसत होते. मतदारांशी प्रत्यक्ष भेटीवर भर देत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि मतदान करण्याचे आवाहन केले. भाजप, काँग््रेास यासह सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला जोर लावला. गोखलेनगर, सेनापती बापट ररस्ता, मुळा रस्ता आदी ठिकाणी प्रचाराची धूम पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरला. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची प्रचार फेऱ्यांमध्ये गर्दी पाहाला मिळाली.
शिवाजीनगरमधील (प्रभाग क्रमांक 12) छत्रपती शिवाजीनगर - मॉडेल कॉलनी प्रभागात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, राष्ट्रवादी, काँग््रेास, शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी मतदारांवर निर्णायक प्रभाव टाकण्यासाठी थेट मैदानात उडी घेतल्याने प्रचारात चांगलाच रंग चढला.
काँग््रेासचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग््रेास आणि शिवसेना (ठाकरे गट) च्या उमेदवारांसाठी वडारवाडी भागातील गोलंदाज चौक येथे सायंकाळच्या सुमारास सभा घेतली. त्यानंतर ते रॅलीतही सहभागी झाले. भाजपच्या उमेदवारांनी आपटे रोड आणि भांडारकर रस्ता येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार केला. त्यानंतर सायंकाळी वडारवाडी परिसरात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पदयात्रा काढत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांनीही वडारवाडी परिसरात पदयात्रा काढत प्रचार केला. तर, विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी पदयात्रा, कोपरा बैठका, घरभेटी, वाहन रॅली आणि रोड शो करत प्रचाराचा धुराळा उडवून दिल्याचे दिसून आले.
उमेदवारांकडून स्थानिक प्रश्नांवर भर, आरोपी-प्रत्यारोपांच्या फैरी
प्रचारादरम्यान, उमेदवारांकडून स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात येत आहे. तर, माजी नगरसेवकांकडून केलेली कामे, समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे अधिक रंगतदार झाली आहेत. उमेदवारांकडून विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासह आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचे चित्र या वेळी दिसून आले. काहीही झालं तरी प्रभागात आपले वर्चस्व रहावे आणि आपला विजय होऊन सत्ता आपलीच यावी, यासाठी उमेदवारांसह सर्वच नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत.
डॉ. कोल्हे, डॉ. गोऱ्हेंच्या सभांनी हडपसरमधील प्रचार शिगेला
राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कोपरा सभा आणि जनसंपर्क अभियानाने रविवारी हडपसर परिसरातील प्रचार शिगेला पोहोचल्याचे दिसले. डॉ. अमोल कोल्हे यांनी रामटेकडी, वैदुवाडी, माळवाडी, हडपसर, सातववाडी परिसरात पदयात्रांद्वारे मतदारांच्या भेटी घेऊन उमेदवारांचा प्रचार केला. तर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांजरी केशवनगर परिसरात कोपरा सभा घेतल्या.