पुणे: प्रभागात प्रचारासाठी आलेल्या वाहनांवर होडी, गरुड यांसारख्या मोठ्या प्रतिकृती लावलेली आपण पाहिल्याच असतील... रोबोटवर पोस्टर लावून केलेला प्रचारही नजरेस पडत असेल, असे अनेक नवनवे फंडे उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरले जात आहेत... त्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरतोय तो राजकीय पक्षांची चिन्हे, उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या मोठ्या प्रतिकृती लावलेली प्रचार वाहने अन् रोबोटद्वारे केलेला प्रचार... अशा विविध गोष्टी मतदारांचे लक्ष वेधून घेत असून, शहरातील अनेक रिक्षाचालक, व्हॅनचालक, टेम्पोचालकांना यामुळे काम मिळाले आहे.
तर काही प्रभागातील उमेदवारांकडून चक्क रोबोटचा वापर होत असून, रोबोटद्वारे प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय व्हॅनवर एलईडी स्क्रीन लावून उमेदवारांच्या कामावर आधारित बनवलेला छोटा माहितीपटही मतदारांना दाखविला जात आहे आणि बऱ्याच उमेदवारांनी अशा नवनवीन शक्कल लढवत प्रचार करण्याला प्राधान्य दिले आहे.
पूर्वी निवडणूक प्रचारात रिक्षावर वाजणारी प्रचार गीते, ऑडिओ क्लिप्स, पत्रकांचे वाटप... या माध्यमातून प्रचार व्हायचा... आजही पारंपरिक पद्धतीने प्रचार करण्याची पद्धत सुरूच आहेच. पण, महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध नवे फंडेही वापरले जात आहेत. त्यामुळे प्रभागात फिरणाऱ्या प्रचारासाठीच्या वाहनांवर लावलेल्या राजकीय पक्षांच्या चिन्हांच्या, उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या मोठ्या प्रतिकृती पाहायला मिळत असतीलच, त्यावर लिहिलेली उमेदवारांची नावे, बॅकग््रााऊंडला वाजणारे प्रचार गीत, ऑडिओ क्लिप्स आपण ऐकलेच असतील.
दिवसभर अशी प्रचार वाहने प्रभागांमध्ये फिरत असून, वाहनांवरील प्रतिकृती मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी व्हॅनवर एलईडी स्क्रीन लावून उमेदवारांच्या कामावर आधारित बनवलेला छोटा माहितीपटही मतदारांना दाखविला जात आहे. तर काही ठिकाणी चक्क रोबोटवर पोस्टर लावून प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारांच्या टीममधील काही सदस्य रिमोटद्वारे रोबोट ऑपरेट करत आहेत आणि हा रोबोट सगळीकडे फिरून उमेदवारांचा प्रचार करताना पाहायला मिळेल.
पर्वती येथे राहणाऱ्या लता खोले म्हणाल्या, सध्या राजकीय पक्षांच्या चिन्हांच्या, उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या मोठ्या प्रतिकृती लावलेली प्रचार वाहने प्रभागात फिरत आहेत. अशा पद्धतीने उमेदवारांकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे, हे पाहायला मिळत आहे. पूर्वी प्रभागात रिक्षावर वाजणारी प्रचार गीते, ऑडिओ क्लिप्स, पत्रकांचे वाटप, याद्वारे प्रचार होत असल्याचे आम्ही पाहिले आहे. पण, यंदा नवेनवे फंडे वापरले जात असल्याचे पाहून छान वाटले.