पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, येत्या 11 नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या सोडतीनंतर 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिक, पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत राहणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेप्रमाणे 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. यानंतरच शहरातील राजकीय समीकरणे आणि संभाव्य उमेदवारींचे चित्र स्पष्ट होईल.(Latest Pune News)
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत 165 नगरसेवक निवडले जाणार असून, एकूण 41 प्रभाग आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चार सदस्यीय तर क्रमांक 38 (आंबेगाव-कात्रज) हा प्रभाग पाच सदस्यीय आहे. एकूण जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने 83 नगरसेविका आणि 82 नगरसेवक अशी रचना होणार आहे. अनुसूचित जातींसाठी (एससी) 22, अनुसूचित जमातींसाठी (एसटी) 2 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 44 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार प्रथम एसटी, एससी आणि नंतर ओबीसीचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित केले जाणार आहे. या सोडतीतूनच कोणत्या प्रभागातून कोण उभे राहणार याचे आराखडे तयार होतील. त्यामुळे सर्व इच्छुक आणि पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष 11 नोव्हेंबरच्या सोडतीकडे लागले आहे.
टप्पा कालावधी/दिनांक
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे - 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर
आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे -8 नोव्हेंबर
आरक्षण सोडत काढून निकाल आयोगाकडे सादर करणे -11 नोव्हेंबर
प्रारूप आरक्षणावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची अंतिम
तारीख - 24 नोव्हेंबर
हरकती-सूचनांवर विचार करून निर्णय घेणे -25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे -2 डिसेंबर