

दौंड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही महायुतीसोबत असणार आहे. आम्हाला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली जी युती होईल. त्यांच्याबरोबर आम्ही असणार आहोत, असे माजी खासदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले. (Latest Pune News)
अहिल्यानगर येथून पुण्याकडे जात असताना दौंड येथे कवाडे यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले, त्या वेळी त्यांनी आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे एका मातंग समाजाच्या युवकावर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला तसेच त्याच्या हातापायावरून दुचाकी नेली. त्याच्या अंगावर लघुशंका केली. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. यातील आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन व्हायला पाहिजे.
फलटण येथील डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू. सरकारने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत द्यावी तसेच पूर्ण कर्जमाफी करावी. शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण, सध्या शिक्षण महाग होत चालले आहे. त्यामुळे सर्वांना शिक्षण घेता यावे, अशी व्यवस्था होणे गरजेचे असल्याचीही अपेक्षा कवाडे यांनी व्यक्त केली.
या वेळी लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे, पुणे जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अमित सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख, संजय आढाव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या देशात व राज्यात ॲट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे वापरला जात नाही. महाराष्ट्रात बौद्ध व दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहेत. काही वेळेस ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पोलिस देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. अशा पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे, असे आवाहन कवाडे यांनी केले आहे.
गया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. देशामध्ये बौद्धांची संख्या मोठी असून, हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात नाही. विविध धर्मांची मंदिरे ही त्यांच्या धर्माकडे असतात, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने याचा विचार करावा, अशी मागणीही जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.