पुणे: महापालिका निवडणुकीचे गुरुवारी (दि. 15) मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, मतदान केंद्रे असलेल्या 125 संवेदनशील इमारतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वी घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने पोलिसांकडून ही तयारी केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सुरक्षा व्यवस्था राबवली आहे. संवेदनशील इमारतीवर अतिरिक्त पोलिस अधिकारी व अंमलदार तैनात केले असून, सतत पेट्रोलिंग, क्यूआरटी पथके आणि स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवली आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेचे विशेष लक्ष यावर राहणार असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
शहरात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पोलिस अंमलदारांपर्यंत तब्बल 12 हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व पातळ्यांवर नियोजन केले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, संजय पाटील, मनोज पाटील आणि राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनमध्ये पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिस सज्ज आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा अतिरिक्त बंदोबस्त मागवला असून, त्यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एका दृष्टीक्षेपात बंदोबस्त
पोलिस आयुक्त - 1, सहआयुक्त - 1, अपर पोलिस आयुक्त - 4, पोलिस उपायुक्त - 14, पोलिस अधिकारी व अंमलदार - 7,000 होमगार्ड - 3,000, एसआरपीएफ - 4 कंपन्या, बाहेरून मागवलेले अधिकारी-कर्मचारी - 1,500, दुचाकीद्वारे पेट्रोलिंग - 500 कर्मचारी, क्यूआरटी - 8.
निवडणुकीनिमित्त सुरक्षा व्यवस्थेची सज्जता
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चारस्तरीय सुरक्षा व्यवस्था राबवली जाणार आहे. यात पोलिस अंमलदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त आणि उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
कोणताही अनुचित प्रकार, वाद किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेची पथके सतर्क ठेवली आहेत. पुणे शहरात एकूण 3 हजार 983 मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्रावर किमान एक पोलिस कर्मचारी तैनात केला जाणार आहे.
तब्बल 913 इमारतींत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्या ठिकाणी प्रत्येकी दोन पोलिस अंमलदारांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने पेट्रोलिंग केले जाणार आहे.
मतदानाच्या काळात शहरातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी स्थानिक पोलिस ठाण्यांसोबतच गुन्हे शाखेवरही असेल. यासाठी शहरात 454 झोन तयार करण्यात आले आहेत.
संबंधित झोनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील इमारतीच्या ठिकाणी एक अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी 8 क्यूआरटी सतत सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
शहरात 6 अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी 50 पोलिस अमलदारांचे स्ट्रायकिंग पथक तैनात राहणार आहे.