पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार असल्याने पुणे शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मंगळवारी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार अखेरचा जोर लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये आज रविवारी सभा, पदयात्रा, कोपरा बैठक, घरभेटी, वाहन रॅली आणि रोड शो यांचा धुरळा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांवर निर्णायक प्रभाव टाकण्यासाठी पक्षांच्या सर्वोच्च नेतृत्वाने थेट मैदानात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कात्रज येथे जाहीर सभा घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट)च्या उमेदवारांसाठी प्रचारफेऱ्यातून मतदारांशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला मोठा उत्साह मिळाला असून, राजकीय समीकरणे अधिक रंगतदार झाली आहेत.
आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने उमेदवारांनी वेळेचे काटेकोर नियोजन केले आहे. सकाळी लवकर पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे. दुपारी घरभेटी आणि कोपरा बैठकींतून स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणार आहे. तर सायंकाळी जाहीर सभा आणि वाहन रॅलींच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जाईल. दरम्यान, प्रचार संपल्यानंतर लगेचच आचारसंहिता अधिक कडक होणार असल्याने उमेदवारांमध्ये तणाव वाढला आहे. अखेरचा रविवार मतदारांच्या मनावर किती प्रभाव टाकतो, यावरच निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा आज पुणेकरांशी संवाद
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भविष्यातील विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुणे शहरतर्फे ‘संवाद पुणेकरांशी’ या विशेष कार्यक्रमाचे आज रविवारी शुभारंभ लॉनमध्ये आयोजन केले आहे. या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक या पुणेकरांच्या वतीने फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम पुण्यातील सर्व प्रभागांमध्ये ‘लाईव्ह स्क्रीन’वर दाखवला जाणार आहे.
भाजपचे दिग्गज नेते उतरले प्रचारात
आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. भाजपकडून खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह आमदार प्रचारात उतरले आहेत. प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने आज धुरळा उडणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा आणि प्रचार रॅली
महापालिका निवडणुकीची लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास अशी असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरले आहेत. रविवारी काही प्रभागांत त्यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे प्रचाराची रंगत आणखी वाढणार आहे.
उमेदवारांचा वैयक्तिक भेटी-गाठींवर भर
उमेदवाराच्या प्रचारार्थ नेतेमंडळी मैदानात उतरली असली तरी उमेदवारांनी देखील थेट भेटी-गाठींवर भर दिला आहे. रविवार असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.