पुणे: महापालिका निवडणुकीत चारसदस्यीय प्रभागरचना असल्याने मतदारांनी चारही उमेदवारांना मतदान करणे अनिवार्य असल्याची महत्त्वाची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. मतदाराने चारपैकी एक, दोन किंवा तीनच उमेदवारांना मत दिल्यास मतदान प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानाच्या वेळी मतदाराने चारपैकी काही उमेदवारांना मते दिल्यास ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत केंद्राध्यक्ष संबंधित मतदाराची दिलेली मते पूर्णपणे गोपनीय राहतील, याची दक्षता घेत मतदान केंद्राबाहेरील सर्व पक्षांच्या बूथ प्रमुखांना बोलावण्यात येईल. त्यानंतर ज्या उमेदवारांना मत देण्यात आलेले नसेल, त्या जागांवर नोटा बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यामुळे मतदाराने दिलेल्या मतांवर कोणताही परिणाम होत नसला, तरी अपूर्ण मतदान टाळण्यासाठी मतदारांनी चारही उमेदवारांना मत देणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अनेक मतदारांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत संभम आहे. ‘चारपेक्षा कमी मते दिल्यास उर्वरित मते आपोआप नोटाला जातील’ किंवा ‘तीनच मते दिली तरी मतदान पूर्ण होईल’ अशा अफवांमुळे गैरसमज पसरत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी चारही मते नोंदवणे गरजेचे आहे. मतदान केंद्रांवर गोंधळ होऊ नये, मतदान प्रक्रियेला विलंब लागू नये, यासाठी प्रत्येक मतदाराने ईव्हीएमवर चार वेळा बटन दाबून मतदान पूर्ण करावे, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ ठेवण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांनी मतदानापूर्वी नियमांची माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
एका ईव्हीएमवर 14 नावे
एका ईव्हीएमवर 14 नावे बसतात जर समजा अ जागेचे 7 उमेदवार असल्यास त्यानंतर 8 व्या जागेवर नोटाचे बटन असणार तर 9 व्या क्रमांकावर ब जागेचे उमेदवार असा मथळा असणार त्यानंतर ब जागेसाठी 4 उमेदवार असल्यास 14 व्या क्रमांकावर नोटाचे बटन असणार. त्यापुढील मशीनवर देखील याच पद्धतीने क आणि ड चे उमेदवार असेल. उमेदवारांची संख्या जास्त असल्यास जास्त मशीन लागतील. काही प्रभागात ही परिस्थिती असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
30 सेकंदांत मतदानाची प्रक्रिया होणार पूर्ण
लोकसभा विधानसभेत एका उमेदवाराला मतदान करायचे असल्याने काही सेकंदात उमेदवारासमोरील ईव्हीएमचे बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण होत होती. महापालिका निवडणुकीत अ, ब, क आणि ड या क्रमानुसार चौघांना मतदान करायचे आहे. त्यामुळे चौघांपुढील बटन दाबण्यासाठी साधारण 30 ते 40 सेकंद लागणार आहे.
महापालिकेसाठी निवडणुकीत 4 उमेदवारांना मतदान करावे. जर एखाद्या व्यक्तीने चार ऐवजी कमी लोकांना मतदान केल्यास मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अशा स्थितीत केंद्राध्यक्ष संबंधित मतदाराची दिलेली मते पूर्णपणे गोपनीय राहतील, याची दक्षता घेत मतदान केंद्राबाहेरील सर्व पक्षांच्या बूथ प्रमुखांना बोलावण्यात येईल. त्यानंतर ज्या उमेदवारांना मत देण्यात आलेले नसेल, त्या जागांवर नोटा बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येईलओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी