Code Of Conduct Pudhari
पुणे

Pune Municipal Election Code Of Conduct Violation: आचारसंहिता काळात बेकायदा जाहिरात फलक लावल्यास गुन्हा; खर्च थेट पक्षाच्या खात्यात

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा; पुण्यात कडक कारवाईचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आचारसंहिता सुरू असताना महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्यास संबंधितांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, जाहिरात फलकावर राजकीय पक्षाचे नाव असल्यास त्याचा संपूर्ण खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुणे महापालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कोणतेही जाहिरात फलक लावण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करत अनेक इच्छुक उमेदवारांकडून शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

देवदर्शनाच्या सहली, धार्मिक यात्रा तसेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्यांची माहिती देणारे फलक चौकाचौकांत झळकत आहेत. याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असताना त्यांनी वरील माहिती दिली. राम म्हणाले, पुणे शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू होताच महापालिकेने शहरातील विविध भागांत राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून लावण्यात आलेले बेकायदा जाहिरात फलक काढून टाकण्याची कारवाई सुरू केली आहे.

महापालिका निवडणूक पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक भागांत इच्छुक उमेदवारांकडून मोफत अष्टविनायक यात्रा, धार्मिक सहली, उज्जैन महाकाळ दर्शन, खेळ पैठणीचा यांसारखे उपक्रम जाहीर केले जात असून, काही ठिकाणी महिला मतदारांसाठी लकी ड्रॉद्वारे परदेशवारी व विमान प्रवासाच्या सहलींचीही जाहिरात केली जात आहे.

बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या इच्छुकांचे फलक तातडीने काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले असून, असे फलक आढळल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचेही आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT