Waterlogging Problem pudhari photo
पुणे

Pune Drain Cleaning Delay: पुण्यात नालेसफाई रखडली; पहिल्याच पावसात शहर तुंबण्याची भीती

पावसाळी वाहिन्यांची केवळ 63 टक्के सफाई पूर्ण; अनेक क्रिटिकल स्पॉट्सवरील कामे अद्याप अपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळा तोंडावर आला असूनही महापालिकेची नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्या स्वच्छतेची कामे अद्याप अत्यंत संथगतीने सुरू आहेत. 31 मेपर्यंत ही सर्व कामे 100 टक्के पूर्ण करणे महापालिकेच्या प्रशासकीय नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, सद्यःस्थितीत शहरातील नालेसफाईचे काम जेमतेम 82 टक्के आणि पावसाळी वाहिन्यांची सफाई तर अवघी 63.58 टक्केच झाली आहे. काही भागांत ही कामे पूर्ण केली जात आहेत. मात्र, त्याचा वेग धीमा असल्याने यंदाही पहिल्याच जोरदार पावसात पुणे तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेमार्फत दरवर्षी पावसाळापूर्व कामे हाती घेतली जातात. शहरात पाणी साचू नये, यासाठी ही कामे केली जातात. यासाठी दर वर्षी निविदा काढून ही कामे केली जातात. यंदा निविदा काढण्यास उशीर झाला. ही कामे देखील संथगतीने सुरू आहेत. 31 मेपूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, कामे रखडल्याने प्रशासनाला ही डेडलाइन गाठणे अशक्य आहे.

महापालिकेच्या स्वतःच्याच अंतर्गत आकडेवारीनुसार, शहरात एकूण 2 लाख 40 हजार 116 मीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या साफ करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी तब्बल 97 हजार 151 मीटर लांबीच्या वाहिन्यांमध्ये अजूनही कचरा आणि गाळ तसाच पडून आहे. सुमारे 40 टक्के वाहिन्या अजूनही सफाई करण्याच्या बाकी आहेत. याशिवाय, 60 हजार 301 पावसाळी चेंबर्सपैकी 22 हजार 357 चेंबर्स अद्याप साफ झालेले नाहीत. काही संवेदनशील झोनमध्ये तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे. झोन 1 च्या हद्दीत पावसाळी वाहिन्यांचे काम अवघे 42 टक्के झाले आहे, तर झोन 5 अंतर्गत येणाऱ्या कसबा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तर हे काम अवघे 25.35 टक्के झाले आहे.

क्रिटिकल स्पॉट्‌‍स अद्यापही ‌‘रामभरोसे‌’!

शहरातील अत्यंत संवेदनशील आणि सखल समजल्या जाणाऱ्या 158 कल्व्हर्ट क्रिटिकल

स्पॉट्‌‍सपैकी 22 ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तर या कामांची प्रगती चक्क शून्य टक्के आहे. पहिल्या पावसात हेच स्पॉट्‌‍स तुंबून वाहतुकीचा मोठा खोळंबा होण्याचा धोका आहे.

जूनचा पंधरवडा उजाडण्याची शक्यता

डेडलाइनजवळ आली, तरी 60 हजारांपेक्षा जास्त मीटर लांबीचे नाले गाळाने भरलेले आहेत. दररोज केवळ 3,564 मीटर नालेसफाई केली जात आहे. या गतीने काम पूर्ण होण्यास जूनचा पंधरवडा उजाडण्याची शक्यता आहे.

शहरात पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. 31 मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, काही ठिकाणी ही कामे संथगतीने सुरू आहेत. संबंधित ठेकेदारांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT