सुनील जगताप
पुणे: पुणे शहराला ‘क्रीडा पंढरी’ म्हणून ओळखले जाते. याच ओळखीला अधिक बळकटी देण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 102 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांचा भव्य जमा-खर्चाचा आराखडा तयार केला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत या प्रस्तावित तरतुदीमध्ये मोठी वाढ केली असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि खेळाडूंसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांवर भर देण्यात आला आहे. या आराखड्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ऐतिहासिक पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे नूतनीकरणाचे आहे. मैदानाचे 10 वर्षांपासून नूतनीकरण झालेले नाही, त्यामुळे त्यासाठी 15 कोटींची भरीव तरतूद प्रस्तावित आहे. तसेच या स्टेडियममध्ये रात्रीचे सामने खेळवण्यासाठी नवीन विद्युत व्यवस्था आणि जनरेटर सेट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
क्रीडा धोरण 2018 अंतर्गत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरावासाठी 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य आणि खेळाडू अपघात विमा योजनेसाठी 25 लाख रुपयांची तरतूद आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि गुणवंत खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी सुमारे 30 लाख रुपये प्रस्तावित आहेत.
शहरात 35 विविध खेळांच्या ‘महापौर चषक’ स्पर्धा आयोजित करण्यासाठी 6 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. क्रीडा विभागाने 58.50 कोटी रुपयांची कामे नव्याने प्रस्तावित केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने हडपसर शूटिंग रेंज येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साहित्यासाठी 2 कोटी रुपये, बाबूराव सणस मैदान येथे नवीन स्वच्छतागृह, चेंजिंग रूम आणि क्रीडा माहिती केंद्राची निर्मिती तसेच शहरातील तलावातील पाण्यासाठी सुरक्षित ‘युव्ही सिस्टिम’ बसवण्यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आराखडा मंजुरीसाठी मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सादर
क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त गोविंद बापट, प्रशासकीय अधिकारी प्रदीप महाडिक आणि क्रीडा उपायुक्त आशा राऊत यांच्या स्वाक्षरीने हा आराखडा मंजुरीसाठी मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावित आराखड्यानुसार महापालिकेच्या अर्थसंकल्पात खेळाडूंच्या पदरी काय पडणार, याकडे लक्ष लागलेले आहे.