पुणे: मिळकतकराच्या बिलातील दुरुस्तीचे काम होत नसल्याने एका वैतागलेल्या नागरिकाने शुक्रवारी (दि.13) थेट पिस्तूल स्वत:च्याच डोक्याला लावून गोळी मारून घेण्याची धमकी अधिकाऱ्याला दिली. मुख्य सभेच्या कामकाजाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने महापालिकेत गोंधळ उडाला. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
महापौर व उपमहापौर निवडीनंतर महापालिकेची शुक्रवारी पहिलीच खास सभा होती. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सायंकाळी चार-साडेचारच्या सुमारास जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मिळकतकर बिलदुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकाचा कर्मचाऱ्यांसमवेत वाद झाला.
या वादातून संबंधित नागरिकाने स्वत:च्या डोक्याला पिस्तूल लावून घेत गोळी मारून घेण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. मात्र, या कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधितांची मनधरणी केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेने पालिकेत खळबळ उडाली. महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्यांनी सुरक्षा विभागाला ही बाब कळवली. यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
अडीच कोटींच्या बिलदुरुस्तीसाठी दबाव
ज्या नागरिकाने स्वत:च्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी मारून घेण्याची धमकी दिली तो कोंढव्यातील रहिवासी आहे. त्याची कोंढव्यात कमर्शिअल मिळकत असून, तिचा जवळपास सव्वा दोन कोटींचा कर थकीत आहे. मात्र, हा कर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. त्यामुळे तो दुरुस्त करण्यात यावा, यासाठी तो पाठपुरावा करीत होता. शुक्रवारी अभय योजनेचा शेवटचा दिवस असल्याने बिलात दुरुस्ती करून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळकत कर विभागात एकाने डोक्याला पिस्तूल लावून गोळी मारून घेतो, अशी धमकी महापालिका कर्मचाऱ्यांना दिली. मिळकतकरामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ही व्यक्ती दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांना त्याचे शस्त्र जप्त करावे, अशा सूचना देण्यात येतील. महापालिका परिसराच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे. महापालिकेत अशा प्रकारे कोणी शस्त्र आणू नयेत, यासाठी सूचना देण्यात येतील.नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका, पुणे
अभय योजनेचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही व्यक्ती महापालिकेत कर भरण्यासाठी आली होती. कराची रक्कम पाहिल्यानंतर या व्यक्तीने हायपर होऊन जिवाचे बरेवाईट करतो म्हणून पिस्तूल कपाळाला लावले. पोलिसांत यासंदर्भात तक्रार देण्यात आली आहे.राकेश विटकर, सुरक्षा विभागप्रमुख