Pune Municipal Corporation Officers Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation Officers: पुणे महापालिकेत अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर; प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांना झुकते माप, उपायुक्तांचा आरोप

महापालिका सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना दुजाभावाची वागणूक; आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनातून तक्रार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप आणि महापालिकेतील सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना दुजाभावाची वागणूक, असा आरोप करत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे धाव घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मानाने वागणूक मिळत नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनातील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्यांनी गुरुवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. मुख्याधिकारी (सीओ) पदावरील अधिकारी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आले आहेत. त्यांना कामकाजात प्राधान्य दिले जाते, तसेच त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधला जातो.

मात्र, महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांशी अपमानास्पद पद्धतीने संवाद साधला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधतानाही शासकीय शिष्टाचाराचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला आहे. कार्यालयीन बैठका आणि चर्चांमध्ये अशोभनीय भाषा वापरली जात असल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

महापालिकेतील अधिकारी काम करत नाहीत, असा गैरसमज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्माण केला जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. सर्व संवर्गांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना समान आणि सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महापालिका प्रशासनात विश्वासाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे. अपमानास्पद वागणुकीमुळे अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होऊ नये, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT