पुणे: बदलीसाठी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आशित जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी हे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या अभियंत्यांच्या दीड महिन्यापूर्वी बदल्या झाल्या होत्या. त्यात जाधव यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली होती. मात्र, त्यांना बांधकाम अथवा पथ विभागात बदली हवी होती, त्यामुळे बदलीच्या आदेशानंतर गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा विभागात रुजू न होता ते प्रदीर्घ रजेवर गेले होते. या कालावधीत बदली रद्द करावी, यासाठी विविध माध्यमांतून प्रशासनावर दबाव आणत होते. याची सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांचे निलंबन केल्याचे अतिरिक्त आयुक्त नायर यांनी सांगितले.
थेट आयुक्तांनाच केला मेसेज
जाधव यांनी एका मध्यस्थामार्फत थेट आयुक्तांकडे बदलीसाठी दबाव टाकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मध्यस्थाने त्यासाठी आयुक्तांच्या नावे थेट मोठ्या रकमेची मागणी केली. ही बाब आयुक्तांना समजातच त्यांनी जाधव यांच्यावर निलंबन कारवाईचे आदेश दिल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.