पुणे: शहरातील झाडणकामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांविरोधात महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. कामाच्या ठिकाणी कचरा साचणे, वारंवार कचरा आढळणारी ठिकाणे (क्रॉनिक स्पॉट) स्वच्छ न होणे आणि सफाई कर्मचारी निश्चित केलेल्या हद्दीत उपस्थित नसणे, अशा त्रुटींमुळे सहा ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत ठेकेदारांकडून सव्वासहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, या कारवाईनंतर झाडणकामात ५० टक्के सुधारणा झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा 'परफॉर्मन्स बेस्ड झाडणकाम' प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील झाडणकाम वेगवेगळ्या ठेकेदारांकडे सोपवण्यात आले आहे.
प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाची गुणवत्ता तपासली जात असून, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनीही काही भागांची पाहणी केली आहे. यापुढे अचानक तपासणी करून त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात प्रियांक एंटरप्रायझेस, प्राइम अव्हेन्यू, सुमित फॅसिलिटीज लि., सिद्धिविनायक इंटरप्रायझेस आणि ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रा. लि. या कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.
‘एलव्हीजी’ला सहा लाखांचा दंड
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३२५, तर वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २७५ कर्मचाऱ्यांच्या झाडणकामाची जबाबदारी एलव्हीजी फॅसिलिटीज इंडिया प्रा. लि.कडे होती.
दोन महिन्यांनंतरही काम अपेक्षेप्रमाणे न झाल्याने प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे ३२५ कर्मचाऱ्यांसाठी ३ लाख २५ हजार आणि २७५ कर्मचाऱ्यांसाठी २ लाख ७५ हजार, असा एकूण सहा लाखांचा दंड वसूल केला.
तसेच कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांच्या कामात त्रुटी आढळल्याने लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दंडामुळे कामात सुधारणा
'पूर्वी केवळ नोटीस दिली जात होती. एका कंपनीला पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. आता एका कर्मचाऱ्यामागे एक हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे झाडणकामात ५० टक्के सुधारणा झाली आहे,' असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले.